राणा कपूर यांच्या कुटुंबियांची ईडी कडून चौकशी

0

मुंबई: येस बँकेतील घोटाळा उघड झाल्यानंतर राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. राणा कपूर यांना ३० तासांच्या चौकशीनंतर रविवारी पहाटे अटक करण्यात आली होती. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता ११ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राणा कपूर यांच्या अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाने राणा यांच्या कुटुंबीयांकडे मोर्चा वळवला आहे. राणा यांची पत्नी बिंदू तसेच त्यांच्या एका मुलीची रविवारी रात्री सुमारे दोन तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

रविवारी रात्री राणा कपूर यांच्या पत्नी, व त्यांच्या मुलीची चौकशी करण्यात आली. रात्री १० वाजता या दोघी ईडी कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर पुढचे दोन तास त्यांची चौकशी करण्यात आली व त्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूर रविवारी विदेशात जाण्याच्या तयारीत असतानाच तिला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले होते. ब्रिटिश एअरवेजने ती लंडनला जाणार होती. त्याआधी ईडीने राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू कपूर व राखी कपूर टंडन, राधा कपूर आणि रोशनी कपूर या तीन मुलींविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे. यापैकी कुणीही परवानगीशिवाय आता देशाबाहेर जाऊ शकणार नाही.