राणी लक्ष्मीबाईंचा लोकप्रतिनिधींना विसर

0

जळगाव – देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या, जाज्वल्य देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाईंचा विसर जळगावातील लोकप्रतिनिधींना व्हावा यापेक्षा दुर्दैव ते कोणते असावे? मंगळवारी, राणी लक्ष्मीबाईंची जयंती होती. परंतु, बेंडाळे चौकातील त्यांचा पुतळा सभोवतीच्या कचर्‍यात दिवसभर धूळखात होता. अखेर सायंकाळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या रणरागिणीचे स्मरण केले आणि जळगावकरांची लाज राखली.

एरवी राष्ट्रवादाचा टेंभा मिरवणारे लोकप्रतिनिधी कुठे तरी गायब झाल्याचे दिसत होते. जमीन ताब्यात मिळविली, वॉर्डात दौरा केला, नागरिकांशी संवाद साधला, आम्हीच कसे देशभक्त? यासारख्या बाता मारणारे ‘चमको’ राणी लक्ष्माबाईंना अभिवादन करण्याऐवजी नेमके होते कुठे? राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या एक, दोन नव्हे तर असंख्य देशभक्तांच्या बलिदानावर आजचे स्वातंत्र्य उपभोगणार्‍यांची देशभक्ती एवढी तकलादू कशी? असा संतप्त सूर आता ऐकायला मिळत आहे.

दरम्यान, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भात प्रशासनाकडे नियोजन असते. याची जबाबदारी ज्यांच्याकडे असते, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी दिली.

अभाविपतर्फे जयंती साजरी
राणी लक्ष्मीबाई यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त, अभाविप शाखा जळगावच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील राणी लक्ष्मीबाई स्मारकाभोवतीने अस्वच्छता होती, त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली व कार्यकर्त्यांनी झाशीच्या राणीला अभिवादन केले. यावेळी वाहतूक पोलीस कॉ. एस. एस. महाजन, अभाविप महानगरमंत्री रितेश चौधरी, प्रदेश कार्यसमिती श्रुती शर्मा, विराज भामरे, धनश्री शिरसाट, गितेश चव्हाण, पवन भोई, आनंद चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.