रावेरसाठी ईश्वर बाबूजींकडून श्रीराम पाटील यांच्या नावाची शिफारस

0

जळगाव-रावेर लोकसभा मतदार संघातून आघाडीच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांनी रावेर मतदार संघासाठी उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची शिफारस केली आहे.

रावेरमधून भाजपकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यावी यावरून आघाडीत पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांनी आज हेलिपॅडवर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासोबत उद्योजक श्रीराम पाटील यांची भेट घालून दिली. त्यांना उमेदवारी देण्याबाबत शिफारस केली. यासंदर्भात दैनिक जनशक्तिने माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, श्रीराम पाटील यांची शिफारस करण्यात आली असली तरी अद्याप त्यांची उमेदवारी निश्चित झालेली नाही. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.