विश्रामजीन्सीत कुजलेला मृतदेह आढळला

0

अनोळखी पुरूषाबाबत ओळख पटल्यास रावेर पोलिसात संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन : व्हिसेरा प्रीझर्व्ह, डीएनए नमूने घेतले

रावेर- तालुक्यातील विश्राम जीन्सी गावाच्या शिवारात तीन ते चार दिवसापूर्वी भगवान महाजन यांच्या शेताच्या नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस पाटील गोकुळ प्रताप पाटील यांनी रावेर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

व्हिसेरा प्रीझर्व्ह, डीएनए सॅम्पलही घेतले
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, विश्रामजीन्सीत आढळलेल्या अनोळखी पुरूषाचे वय 40 वर्ष असून बांधा मध्यम, रंग सावळा, उंची 165 सेंटी मीटर, केस काळे व दोन ते तीन इंच लांबीचे, अंगात काथ्या कलरचा फुलबाईचा शर्ट व त्यावर पांढर्‍या रंगाच्या लायनिंग ग्रे रंगाची फुलपॅन्ट, निळ्या रंगाची अंबर कंपनीची निकर, डाव्या दंडावर उडते हनुमानजीचे गोंदलेले छायाचित्र व लालसिंग असे नाव गोंदलेले आहे. एक टायगर कंपनीचा डाव्या पायाचा बूट व 8 नंबरचा पिवळसर व टोकावर काळसर बूट असे वर्णन असून मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. अनोळखीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी जंजीर डॉगला पाचारण करण्यात आले तसेच फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले. मृतकाचे व्हिसेरा व डीएनए सॅम्पल घेण्यात आले असून संशयास्पद वस्तू वगैरे घटनास्थळी मिळून आली नाही. मृताबाबत ओळ पटत असल्यास नातेवाईकांनी रावेर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. घटनास्थळी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व पोसिल निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट दिली. पुढील तपास उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.