रावेर लोकसभेतून काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर

0 1

मंगळवारी संयुक्त मेळाव्यानंतर अर्ज भरणार

जळगाव – जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (कवाडे गट) महाआघाडीतर्फे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारी जाहीर केली. दरम्यान या मतदारसंघात आता खा. रक्षा खडसे यांच्याविरूध्द डॉ. उल्हास पाटील असा सामना रंगणार आहे.

जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडल्यानंतर उमेदवार म्हणुन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे नाव आघाडीवर होते. आज मुंबई येथे पक्षाचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातुन डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परीषदेत प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी रावेर मतदारसंघातुन डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.

डॉ. उल्हास पाटील मंगळवारी अर्ज भरणार

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या उमेदवारी अर्जासाठी दि. २ रोजी मंगळवारी स. १० वा. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात महाआघाडीचा संयुक्त मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यानंतर डॉ. उल्हास पाटील हे अर्ज भरणार आहेत.