राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची निरीक्षकपदी नियुक्ती

0

मावळ मतदार संघातील निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील नगरसेवकांची पिंपरी-चिंचवड, मावळ मतदार संघाच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नगरसेवक बाबूराव चांदेरे आणि मावळ विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून विजय कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, भोसरीच्या निरीक्षकपदी माजी महापौर दत्ता धनकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे..

मावळ मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पार्थ यांना निवडून आणण्यासाठी पवार कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पार्थ यांच्या प्रचाराचा नारळ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते वाढविण्यात आला आहे. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली असून नगरसेवकांच्या बैठकांचे सत्र सुरु केले आहे.

दरम्यान, पिंपरी, चिंचवड आणि मावळ मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिका-यांची अजित पवार आज (गुरुवारी) चार वाजता रावेत येथे बैठक घेणार आहेत. सायंकाळी सहा वाजता भोसरीतील नगरसेवकांची बैठक होणार आहे.