राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदासाठी देवकर समर्थकांची मोर्चेबांधणी

0

समर्थकांचे खा. शरद पवारांकडे निवेदनाद्वारे साकडे


जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबुत करण्यासाठी आणि पक्षविस्तारासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करावी अशा मागणीचे साकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे घालण्यात आले आहे. देवकरांना जिल्हाध्यक्ष करण्यासाठी हालचाली गतीमान झाल्याचे दिसुन येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचा नुकताच जिल्हा दौरा झाला. या दौर्‍यात त्यांनी पक्ष कार्यालयात बसुन संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. सन 2009 मध्ये पक्षाचे सहा आमदार होते. त्यानंतर मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादीला उतरती कळा लागली. आज जिल्ह्यात पक्षाचा गतवेळीप्रमाणे एकच आमदार आहे. ते देखिल तालुक्यापुरता मर्यादीत आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षाला फारसे यश मिळालेले नाही. त्यामुळे पक्षसंघटना हि कमकुवत झाली आहे. जळगाव शहर महापालिकेत पक्षाचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे शहरातील संघटनही मजबुत नाही. परिणामी जिल्ह्यात आगामी काळात होणार्‍या सहकारी संस्थांसह इतर निवडणुकांना सामोरे जातांना आक्रमक आणि संघटन वाढविणारे नेतृत्व पक्षाला हवे आहे. त्याचीच चाहुल म्हणून की काय? राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी गुलाबराव देवकर यांना संधी मिळवुन देण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत.

खा. शरद पवारांना साकडे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची नियुक्ती करण्याची मागणी खा. शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गुलाबराव देवकर यांनी मागील काळात जिल्हाध्यक्ष असतांना विभागीय मेळावे घेऊन जिल्हाभर संघटन वाढीचे कार्य केले. तसेच पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यात बंदीस्त नाट्यगृह, बहिणाबाईंचे स्मारक, बालकवींचे स्मारक, उड्डाण पुल अशी अनेक कामे मंजुर केली. जलसिंचनाची देखिल कामे केली. त्यामुळे त्यांना संधी मिळावी.

सत्ताकाळ संघटन वाढीसाठी फायदेशीर

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जिल्ह्यात पालकमंत्री आणि चार आमदार हे शिवसेनेचे आहेत व एक राष्ट्रवादीचा आमदार आहे. शिवसेनेप्रमाणे सत्तेचा फायदा संघटन वाढीसाठी करून घेण्याकरीता प्रशासनाचा आणि संघटनेचा पुर्वानुभव असलेल्या गुलाबराव देवकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षर्‍या

खा. शरद पवार यांना दिलेल्या निवेदनावर, नामदेवरा चौधरी, वाल्मीक पाटील, ओबीसी सेलचे हिम्मतराव पाटील, बापु परदेशी, मंगला पाटील, रमेश माणिक पाटील, विनायक चव्हाण, नारायण चौधरी, एन.डी. पाटील, अजय सोनवणे, सुनील पाटील, रवि पाटील, मधुकर पाटील, मोहन पाटील, डॉ. नितीन पाटील, संजय चव्हाण, कैलास पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.