रास्ता रोको: जि.प.उपाध्यक्षांसह 10 जणांविरोधात गुन्हा

0

ठिय्या आंदोलन केल्यामुळे वाहतूक कोंडी


जळगाव: जळगावकडून भुसावळकडे जाणार्‍या कंटनेरने हॉटेल कारागिर दगडू उर्फ बाळू देविदास पाटील यास चिरडल्याची घटना बुधवारी घडली होती. या अपघातानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह इतरांनी रस्त्यावर ठिय्या मांडून हद्दीचा प्रश्न निर्माण करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा, त्यांना तसेच पोलीस अधीक्षकांना घटनास्थळावर बोलवा म्हणून रास्ता रोको आंदोलन केले. हे प्रकरण जि.प.उपाध्यक्षांना महागात पडले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे साडे तीन वाजता लालचंद पाटील यांच्यासह नशिराबादचे सरपंच विकास पाटील योगेश उर्फ पिंटू पाटील, भिका राजाराम (पूर्ण नाव नाही), पुष्पराज रोटे व आप्पा गंगाराम (पूर्ण नाव) यांच्यासह इतर सहा ते सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून वाहतूक सुरळीत

अपघातानंतर लालंचद पाटील यांच्यासह इतरांनी रास्तो आंदोलन केले. यावेळी महामार्ग दोन तास बंद झाला होता. तसेच वाहतुकीची कोंडी झाली तसेच इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण केला. गैरकायद्याची मंडळी जमविली तसेच मृतदेहाची अवहेलना केली. अशा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी श्रीकांत धनराज बदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, गोविंदा पाटील, जितेंद्र राजपूत, तुकाराम निंबाळकर, सचिन पाटील, लुकमान तडवी, इम्रान सय्यद व नशिराबादचे सहायक निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह कर्मचार्‍यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करुन पहाटे तीन वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत केली.

उपाध्यक्ष अन् पोलिसांमध्ये झाला होता वाद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा दोन पोलीस ड्युटी आटोपून दुचाकीने भुसावळकडे जात होते. अपघात झाला तेव्हा ते तेथे थांबले. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी जखमीला जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलवा म्हणून लालचंद पाटील यांनी या पोलिसांना सांगितले, मात्र दुचाकीवरील व्यक्ती मृत झाला असून वाहतूक सुरळीत करणे आवश्यक असल्याचे या पोलिसांकडून सांगण्यात आले, त्यामुळे लालचंद पाटील व पोलिसांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. दरम्यान, नेमके ते पोलीस कोण, कोठे नियुक्तीला आहेत हे स्पष्ट झालेले नाही.