राहुल गांधींच्या वक्तव्याचे नागपूर अधिवेशनात पडसाद; भाजप आमदार आक्रमक

0

नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. राहुल गांधींच्या या विधानामुळे संपूर्ण देशात विरोध होत आहे. त्यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. दरम्यान राज्याच्या विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. त्यातही विरोधकांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यावरुन सभागृहाबाहेर गोंधळ सुरू केला आहे. भाजपाच्या सर्वच आमदारांनी मी सावरकर नावीच टोपी परिधान करुन विधिमंडळात प्रवेश केला. राहुल गांधींच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, केवळ सहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सावरकरांच्या अपमानावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा डाव असल्याची भूमिका घेत, सत्तारूढ महाविकास आघाडी भाजपला जोरदार प्रत्युत्तर देत आहे.