राहुल गांधींच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ; खासदारांमध्ये धक्काबुक्की !.

0

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल ‘सहा महिन्यानंतर नरेंद्र मोदी बाहेर निघणार नाही, तरुण त्यांना मारतील’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल गांधींनी मोदींचा एकेरी उल्लेखही केला होता. त्यावरून आज लोकसभेत भाजप खासदारांनी गदारोळ केला. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी केली. यावेळी जोरदार हंगामा झाला. हा गदारोळ इतका वाढला की खासदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत चांगलाच समाचार घेतला होता. ” मी सहा महिन्यात सूर्यनमस्कार करुन स्वतःला मजबूत बनविणार आहे, अशा शब्दात मोदींनी राहुल गांधींना फटकारले होते.

मात्र शुक्रवारी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन लोकसभेत चांगलाच गदारोळ झालेला पाहण्यास मिळाला. डॉ. हर्षवर्धन यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. देशाच्या पंतप्रधानांबाबत एखादा माणूस ही भाषा कशी काय वापरु शकतो? लोक पंतप्रधानांना लाठीने मारतील असं राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. राहुल गांधी यांचे वडीलही देशाचे पंतप्रधान होते. अशा माणसाने तरी पंतप्रधानपदाचा आदर ठेवायला हवा असंही हर्षवर्धन यांनी राहुल गांधींना सुनावलं.