रेडझोन, कंटेंनमेंट झोन वगळता उद्यापासून इतरत्र एसटी बस सेवा

1

मुंबई:- कोरोना महामारीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून २२ मे पासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व अॅड.अनिल परब यांनी दिली.

तसेच ते पुढे म्हणाले की, २३ मार्च पासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु लॉकडाऊन च्या चौथ्या कालखंडामध्ये राज्यशासनाने रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता काही अटीशर्तींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्या-अंतर्गत एसटी बस सेवा सुरू करण्याची माहिती दिली.

त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर उद्यापासून एसटी बस सेवा सुरु होत आहे. अर्थात,त्यासाठी काही नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जिल्हा-अंतर्गत सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत बस सेवा सुरु राहील. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील. सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे असणार आहे. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.
या अटी व शर्तींचे पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी केले आहे.