रेल्वेच्या फॅन्सिंगवरून लोटगाडी चालक व रेल्वे अधिकार्‍यांमध्ये वाद

0

अखेर बंद पडले काम ; कागदपत्रे सादर करण्यास रेल्वेचा दोन दिवसांचा अल्टीमेटम

भुसावळ- रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवण्यानंतर रेल्वेने आता विकासकामांना प्राधान्य दिले असून आरपीडी रोडवर फॅन्सिंगच्या कामासाठी मंगळवारी खड्डे खोदण्याच्या कामास सुरुवात झाल्यानंतर हातावर पोट भरणार्‍या लोटगाडी विक्रेत्यांनी या कामास विरोध दर्शवला. ही जागा पालिकेच्या मालकिची असल्याचे सांगितल्याने किरकोळ वाद वाढल्यानंतर नागरीक थेट डीआरएम कार्यालयात धडकले. 24 मीटर रूंदीचार आरपीडी रोड पालिकेच्याच मालकिचा असल्याचे 28 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचा दाखला देत काही कागदपत्रे रेल्वे अधिकार्‍यांना दाखवण्यात आली. पालिकेने आम्हाला लोटगाड्या लावू देण्यासाठी परवानगी दिल्याने रेल्वे प्रशासनाने आम्हाला येथून बाहेर काढल्यास पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण होईल, अशी व्यथा मांडण्यात आली. याप्रसंगी रेल्वेचे डीईएन आर.एस.तोमर (स्पेशल वर्क्स) यांनी संंबंधिताना पालिकेचे मुख्याधिकारी, तहसीलदार वा प्रांतांसोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवावे, असे सांगत ही जागा रेल्वेचीच असून ती रस्ता रूंदीकरणासाठी पालिकेला दिल्याचे सांगितले मात्र लोटगाडी धारक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तूर्त दोन दिवस काम बंद ठेवण्यात येणार असून पालिकेच्या भूमिकेनंतर रेल्वे प्रशासन पुढील निर्णय घेणार आहे. प्रसंगी शेख सलीम, भास्कर शेवाळे, अशोक शिंदे, पिंजवाी, विनोद पाटील, भानु बारस, राजू पिंजारी, बबलू सिद्दीकी, लक्ष्मण तायडे यांच्यासह हातावर पोट भरणारे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.