भरधाव चारचाकीच्या धडकेत वरणगावातील विद्यार्थ्याचा मृत्यू

0

वरणगाव : फुलगाव येथील टेक्नीकल विद्यालयातून घराकडे परतणार्‍या विद्यार्थ्याला भरधाव चारचाकीने धडक दिल्याने त्याचा जागीच करुण अंत झाल्याची घटना बुधवारी सकाळी 9.40 वाजता राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजी नगरासमोरील राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघातात रोहित सुनील इंगळे (17) हा विद्यार्थी जागीच ठार झाला.

चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा
रोहित हा आपल्या मित्रासह फुलगाव येथील शासकीय तांत्रिक विद्यालयातून दुचाकी (एम.एच.19 डी.जी.6339) वरून वरणगावकडे येत असताना शिवाजी नगरजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार (एम.एच 19 सी.व्ही.0990) ने धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या मागे बसलेला रोहित जमिनीवर पडला व त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला जखशी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषीत केले. या घटनेनंतर डॉ.आंबेडकर नगरातील नागरीकांसह नातेवाईक मित्र परीवाराने रुग्णाबाहेर मोठी गर्दी केली. अपघात प्रकरणी मयत रोहितचे वडिल सुनील रमेश इंगळे (47, रा.डॉ.आंबेडकर नगर, वरणगाव) यांच्या फिर्यादि वरून आरोपी भरत परदेशीविरूध्द वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुनील वाणी, हवालदार नितीन निकम करीत आहेत.

अपघाती कारमध्ये परदेशी नागरीक
ज्या कारने अपघात घडला त्या कारमध्ये आयुध निर्माणीतील मशीन दुरुस्त करणार्‍या इस्त्राईल या बाहेरील देशील मॅकेनिक होते. या अपघातात विदेशी नागरीक जवाबदार असल्याच्या संशयातून जमावाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. कार चालकाला सुरक्षा म्हणुन पोलिसांनी मुक्ताईनगर येथील लॉकपमध्ये रवाना केले. जमावाने व नातेवाईकांनी अपघातास कारणीभूत असलेला चालक आम्हाला दाखऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही तो पर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. वातावरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीकुमार बोरसे यांनी अतिरीक्त पोलिस दलाची एक तुकडी बंदोबस्तासाठी मागवली होती. दरम्यान, मयत रोहित हा महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी सायन्स शाखेत शिक्षण घेत होता शिवाय कुटुंबीयाचा तो एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात आली.