रोकडेतील ‘त्या’ बिबट्याचा विष प्रयोगाने मृत्यू !

0 2

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; व्हिसेरा प्रिझर्व्ह

चाळीसगाव- तालुक्यातील रोकडे गावाजवळील बाणगाव रस्त्यावरील सुपडू देवराम पाटील या शेतकर्‍याच्या शेतीच्या बांधावर चार वर्षीय नर जातीच्या बिबट्याचा मृतदेह सोमवारी दुपारी चार वाजता आढळला होता. सायंकाळ झाल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी घटनास्थळावर पशूधन विकास अधिकारी डॉ.एम.बी.गुंडीगुडे, डॉ.दीप्ती कच्छवा, डॉ.संदीप भट यांनी शवविच्छेदन केले. बिबट्यावर विष प्रयोग करण्यात आल्याची दाट शक्यता असून व्हिसेरा प्रिझर्व्ह करण्यात आला असून तो नाशिकच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून अहवालानंतर बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. शवविच्छेदनावर शासकीय इतमामात बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
घटनास्थळी उपवनसंरक्षक डिगंबर पवार, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनक्षेत्रपाल संजय मोरे, धनंजय पवार, गणेश गवळी यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.