लाचखोर तलाठ्यास चार वर्षाची शिक्षा

0

दोन गुन्ह्यात सात वर्षाची शिक्षा आणि एकुण 10 हजार रूपयांचा दंड

जळगाव । सातबारा उतार्‍यातून बहिणीचे नाव कमी करण्यासाठी तात्कालीन तलाठी यांना तक्रारदाराकडून 1500 रूपयांची लाच घेतांना अटक केली होती. याबाबत रामानंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज न्यायालयात कामकाज झाले असता न्यायालयाने तलाठी यास दोषी ठरवून चार वर्षाची शिक्षा आणि 5 हजार रूपये दंड तर दुसर्‍या गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रूपये दंड अश्या दोन शिक्षा ठोठावण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी 7/12 उतार्‍यावरून त्यांच्या बहिणींचे नावे कमी करण्यासाठी तत्कालिन तलाठी सत्यजित अशोक नेमाने यांच्याकडे गेले असता त्यांना बहिणींचे नावे कमी करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून 1500 रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचत विभागाकडे तक्रार दिल्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी सापळा रचून आरोपी तात्कालीन तलाठी सत्यजित अशोक नेमाने यांनी तक्रारदाराकडून 1500 रोख रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर रामानंद पोलीसात भाग 6 गुरनं 3018/2016 लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज न्या.पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता तत्कालिन तलाठी सत्यजित अशोक नेमाने यांना दोषी ठरवत तीन वर्ष शिक्षा व पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद तसेच कलम 13 अन्वये चार वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्यात तपासाधिकारी तात्कालिन पोलीस उपअधिक्षक पराग सोनवणे हे होते. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मोहन देशपांडे तर आरोपीतर्फेअ‍ॅड.आर.के.पाटील हे होते.