लेखापरीक्षणात ‘पीएमपी’वर ताशेरे

0

प्रवासी वाढ आणि महसूल वाढीवर भर देण्याचा सल्ला

पुणे : पीएमटी आणि पीसीएमटी या वाहतूक संस्थांचे विलिनिकरण करण्यात आले. मात्र, हाच निर्णय या संस्थेच्या आणि पर्यायाने प्रवाशांच्या मुळावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी केलेल्या लेखा परीक्षणात पीएमपीएमएल प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय गतिमानता, प्रवासी वाढ आणि त्यामाध्यमातून महसूल वाढीवर भर द्या असा सल्लाही या महापालिकांनी दिला आहे.

विपरीत परिणाम होण्याचे संकेत

पीएमपीएमएल प्रशासनाचा तोटा जवळपास 950 कोटी रुपयांवर गेला आहे. या आर्थिक संकटाच्या कालावधीत पीएमपी प्रशासनाला पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आर्थिक हातभार लावत आहेत. मात्र, प्रवासी संख्या आणि महसूल वाढविण्यात प्रशासनाला अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळेच या दोन्ही महापालिका आणि पीएमपीएमएल प्रशासनामध्ये वादाचे प्रसंग वारंवार घडत आहेत, त्यातच या दोन्ही महापालिकांनी आता थेट लेखा परीक्षणाच्या माध्यमातून प्रशासनावरच निशाणा साधला असल्याने आगामी काळात त्याचे विपरीत परिणाम होण्याचे संकेत मिळत आहेत.

वाहतूक व्यवस्था सक्षम करा

प्रशासनाचा मनमानी कारभार, प्रवासी संख्या आणि त्यामाध्यमातून वाढणारा महसूल यासाठी प्रशासनाने कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे दोन्ही महापालिकांचे म्हणणे आहे. हे वास्तव असतानाच नादुरुस्त आणि जुन्या बसेस मार्गावर पाठविण्यात येत असल्याने हा तोटा आणखीनच वाढत चालला असल्याचा ठपका प्रशासनावर ठेवण्यात आला आहे. आगामी काळात हा कारभार सुधारण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही दोन्ही महापालिकांच्या वतीने पीएमपीएमएल प्रशासनाला देण्यात आला आहे.