लेवा गुर्जर समाजाचा लवकरच ओबीसीमध्ये समावेश होणार

0

खासदार रक्षा खडसे यांचे आश्वासन; जळगावात लेवा गुर्जर समाजाच्या राज्यस्तरीय मेळावा ; 318 विवाहेच्छुकांनी दिला परिचय

जळगाव:वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून राज्यभरातील समाज एकत्रित येऊन विचारांचे आदान-प्रदान करण्यास मदत होते. वेळ आणि पैशांची बचत करण्याचे हे प्रभावी माध्यम आहे, गेल्या अनेक वर्षांपासून लेवा गुर्जर समाजातर्फे ओबीसीमध्ये स्थान मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून, पुढील वर्षीच्या मेळाव्याआधी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झालेला असेल, असे आश्वासन खासदार रक्षा खडसे यांनी या मेळाव्यात दिले.

युवक-युवती परिचय सूची 2019चे प्रकाशन

शहरातील लेवा भवनात श्री लेवा गुर्जर सेवा प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवारी घेण्यात आला. त्यात समाजातील विवाहेच्छुक 318 युवक-युवतींनी परिचय करून दिला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे होते तर अध्यक्ष शांताराम महाजन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदू महाजन, समीर मैंद, वसंत महाजन, व्ही.डी. पाटील, रमेश पाटील, रोहिदास चौधरी, भागवत पाटील, अनिल महाजन, प्रवीण चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थानचे माजी अध्यक्ष बाबूराव पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर समाजातील 141 युवती व 177 युवकांनी आपला परिचय करून दिला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते युवक-युवती परिचय सूची 2019चे प्रकाशन करण्यात आहे.

प्रतिष्ठानतर्फे खासदार आमदारांचा सत्कार

समाजातील विशेष प्रगती, विकासाची कामे केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार सुरेश भोळे व खासदार रक्षा खडसे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याने त्यांचा लेवा गुर्जर प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अ‍ॅड. प्रदीप महाजन यांनी केले, सूत्रसंचालन क्रांती पाटील यांनी केले. सुनील चौधरी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने मेळाव्याचा समारोप करण्यात आला.

समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : आ. भोळे


समाजाच्या विकासासाठी समाजबांधवांनी एकत्र येऊन सांघिक भावनेतून कामे करणे अपेक्षित आहे. सामाजिक, धार्मिक अथवा इतर कोणतेही काम करताना समाजबांधवांनी एकत्र यावे, असे मत आमदार सुरेश भोळे यांनी केले. अध्यक्ष शांताराम महाजन यांनीही मनोगत व्यक्त करताना मेळाव्यास व्यापक स्वरूप मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यभरातील समाजबांधव या मेळाव्याला उपस्थित होते.