लॉकडाऊनचा फायदा घेत पपई खरेदीदार व्यापारी धरताहेत शेतकऱ्यांना वेठीस

0

भाव कोसळल्याने शेतकरी मेटाकुटीला

शहादा। कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन असताना त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला. परंतु प्रशासनाच्या सहकार्याने तो तोडगाही निघाला. शेतीमाल वाहतुकीसाठी रितसर परवाना घेऊन वाहतुकीस परवानगी प्रशासनाने दिलेली आहे. परंतु या लॉकडाऊनचा फायदा घेत पपई खरेदीदार व्यापारी मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचे चित्र दिसत आहे. तब्बल चार रुपये प्रति किलोप्रमाणे पपईची खरेदी सुरू असून अचानक भाव कोसळल्याने शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.

जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली आहे .यंदा उशिराने लागवड झाल्याने फळधारणाही उशीराच झाली. त्यामुळे ऐन बहरात असताना व्यापाऱ्यांनी अनेकवेळा हंगामात शेतकऱ्यांना दरासंबंधी वेठीस धरले होते. आता तर कोरोनाचे कारण पुढे करत शेतकऱ्यांना पुरते मेटाकुटीस आणले आहे. पपई हे नाशवंत पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा साठाही करता येत नाही.शिवाय बाजारपेठ जवळपास नसल्याने स्वतःही विकणे अवघड होते. त्यामुळे सर्वस्वी व्यापाऱ्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. पपई खरेदीदार व्यापारी मात्र संधीचे सोने करण्याची तसूभरही संधी सोडत नाहीत, हे आजपर्यंत घडलेल्या घटनांवरून जाणवते. वास्तविक पाहता बाहेरील राज्यांमध्ये पपईची ठोक विक्री सोळा ते सतरा रुपयांप्रमाणे सुरू आहे. व्यापाऱ्यांना माल खरेदी करून संबंधित बाजारपेठेत पोहचवण्यासाठी सहा रुपये प्रति किलोप्रमाणे खर्च येत असल्याचे सांगितले जाते. तरीही शेतकऱ्यांकडून चार रुपये किलोप्रमाणे खरेदी सुरू आहे. यात मात्र शेतकरी होरपळत आहे.

नगरसेवकाचा पुढाकार

लॉकडाऊन असलेल्या परिस्थितीत प्रशासनाने शेतीमाल वाहतुकीसाठी मुभा दिली असली तरी व्यापारी शेतकऱ्यांच्या मालाला तोडणीसाठी धजावत नव्हते. शहादा पालिकेचे नगरसेवक संदीप पाटील यांनी पुढाकार घेत प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी व व्यापारी यांच्यात एक बैठक घेऊन माल तोडणी संबंधी तोडगा काढला व शेतकऱ्यांच्या मालाला तोडण्याचे आवाहन केले .मात्र दरासंबंधीचा तोडगा अद्यापही कायम आहे .तो तोडगा काढून शेतकऱ्यांची होणारी होरफळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.

” शेतकऱ्यांची पपई झाडावरच पिकत होती. लॉक डाऊनचे कारण पुढे करत व्यापारी तोडणीस धजावत नव्हते. प्रशासन व व्यापारी यांच्यात बैठक घेऊन पपई तोडणी संबंधी तोडगा निघाला. परंतु दराबाबतची समस्या अजूनही कायम आहे.”

संदीप पाटील, नगरसेवक, पपई उत्पादक शेतकरी, शहादा