लॉकडाऊनमुळे छायाचित्रकार आर्थिक अडचणीत

0

नंदुरबार जिल्ह्यातील स्थिती

नंदुरबार –   कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर जारी झालेल्या लॉकडाऊनमुळे नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सुमारे एक हजार छायाचित्रकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हातावर पोट असल्याप्रमाणे छायाचित्रकारांना देखील चिंता सतावत आहे.

मार्च ते जून महिन्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर लग्न सोहळे आणि सार्वजनिक व घरगुती समारंभांचा हंगाम असतो. मात्र यंदा कोरोना मुळे या हंगामा वरील संकट अधिक गडद झाले आहे. छायाचित्रणा बरोबरच एडिटर, ग्राफिक डिझाईनर, फोटो एडिटर, एक्सपोजिंग त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  नंदुरबार शहर तथा जिल्ह्यात सुमारे एक हजारावर व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. यात अनेक व्यवसायिकांनी लाखो रुपये गुंतवणूक करून कॅमेरे, संगणक, ड्रोन आणि स्टुडिओ उभारले आहेत. याशिवाय यातून अनेकांना रोजगार मिळत होता. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर हौशी छायाचित्रकार आहेत. किंबहुना फोटोग्राफी हेच त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. नंदुरबारसह शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा, मोलगी आणि नवापूर येथील सर्वच छायाचित्रकारांचे कामकाज सध्या बंद पडले आहे. दरवर्षी मार्च ते जून दरम्यान मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभाच्या ऑर्डर नोंदणी असल्याने सर्व छायाचित्रकारांनी नियोजन केले होते. परंतु कोरोना पार्श्वभूमीवर विवाह सोहळे रद्द करण्यात आले आहेत, त्यापाठोपाठ देशभर जारी झालेल्या लॉकडाऊन नंतर संकटात आणखीनच भर पडली.