लॉकड‍ाऊनमध्येही चोरटे जोमात: एटीएम तोडून १४ लाख ४१ हजाराची रक्कम लांबविली

0

जळगाव: शहरातील शिव कॉलनी उड्डाण पुलाजवळ असलेल्या स्टेट बँक शाखेचे बाहेरील एटीएम तीन चोरट्यांनी गॅस कटरने तोडून त्यातील १४ लाख ४१ हजार रूपयांची धक्कादायक घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. तोंडाला रुमाल बांधलेले तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून याच फुटेजच्या आधारावर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान जळगाव पोलिसांसमोर आहे. लॉकडाउनच्या काळात घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

एटीएम हे गॅस कटरने तोडून चोरट्यांनी यामध्ये असणारी १४ लाख ४१ हजार रूपयांची कॅश लांबवून पोबारा केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या एटीएममध्ये अजून सात लाख रूपयांची रोकड असल्याचे दिसून आले. दरम्यान पोलीसांनी बँकेने लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता. यात तीन जण तोंडाला रूमाल बांधून मध्यरात्री १ वाजून ५५ मिनीटांनी दाखल झाले. दोन्ही एमटीएम गॅस कटरने फोडून रोकड घेवून तीने चोरटे २ वाजून ३३ मिनीटांनी एटीएमच्या बाहेर पडले. यावेळी सोबत चारचाकी गाडी असल्याचे समजते. अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी घटनास्थळी भेट दिली असून जिल्हा पेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.