लोकसंघर्ष मोर्चातर्फे बेरोजगारांचा 6 रोजी आक्रोश मोर्चा

0

युवकांच्या न्याय हक्कासाठी भुसावळ ते जळगाव लाँग मार्च -प्रतिभा शिंदे

भुसावळ- बेरोजगार युवकांच्या विविध मागण्या तसेच न्याय हक्कासाठी भुसावळ ते जळगाव पायदळ मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांनी दिली. 6 रोजी दुपारी 12 वाजता भुसावळच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राऊंड) पासून पायदळ मोर्चाला सुरुवात होईल. याच दिवशी सायंकाळी नशिराबादला हा मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे सभा होवून मोर्चेकरी मुक्कामास थांबतील तर 7 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता नशिराबादवरून निघून जळगाव कडे मोर्चेकरी प्रयाण करून नंतर जिल्हाधिकार्‍याना निवेदन देतील, असेही शिंदे म्हणाल्या.

चार वर्षात स्थानिक रोजगार नाहीच
एनएसएसओ (नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस)च्या सर्वेक्षणानुसार 2014 साली बेरोजगारांचीची संख्या 2.2 % होती तर तो रेशो प्रचंड वाढून 2018 मध्ये 7.4 टक्के झाला. दरवर्षी दोन कोटी नोकर्‍या देण्याचे वचन देऊन हे सरकार मोठ्या दिमाखाने व प्रचंड बहुमताने सत्तेवर आले मात्र प्रत्यक्षात गेल्या चार वर्षात किमान स्थानिक रोजगारही मिळालेला नाही. नोकरीची भरती प्रक्रिया थांबवण्यात आली असून ज्या निघत आहेत त्यांच्या लाखपटीने अर्ज प्राप्त होत असल्याने बेरोजगारांना रोजगारच मिळत नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, मोर्चात सर्व प्रमुख राजकीय पक्षांना त्यांचा निवडणुकीचा अजेंडा काय असेल आणि तरुणांना त्यांच्या जाहीरनाम्यात किती जागा असतील याबद्दलही प्रश्न विचारले जाणार आहे. या मोर्च्यात बेरोजगार युवकांनी मोठया संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन लोकसंघर्ष मोर्चातर्फे करण्यात आले आहे.