लोकसभेच्या मतदानापूर्वी 4 एमपीडीए, 60 तडीपारांवर कारवाईची कुर्‍हाड

0

पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची माहिती

अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरींग दोरजे यांनी घेतला आढावा

जळगाव- आगामी लोकसभा निवडणूक तसेच सण, उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. याकरीता पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवायांचे प्रस्ताव तयार केले आहे. जिल्ह्यात 4 एमपीडीए आणि 60 तडीपारच्या कारवाया प्रस्थापित करण्यात आल्या असून आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानापूर्वी प्रस्तावीत एमपीडीए, 60 तडीपारांवर कारवाई करणार असल्याची अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली.

राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरींग दोरजे यांनी सोमवारी जळगाव जिल्ह्याचा निवडणूकपूर्व आढावा घेतला. पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यासोबत वैयक्तिकरित्या चर्चा करून माहिती जाणून घेतली व सूचना केल्या.

प्रतिबंधात्मक कारवायांवर भर, भुसावळात सर्वाधिक तडीपार
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यावर भर देण्यात येत असून कलम 107 नुसार कारवाईचे प्रस्ताव तहसिलदारांकडे तर तडीपार कारवाईचे प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे पाठविण्यात येत आहे. जिल्ह्यात 60 तडीपारचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून त्यात भुसावळ आणि जळगावचे सर्वाधिक असल्याचे डॉ.उगले यांनी सांगितले. सर्व प्रतिबंधात्मक कारवाया मार्च महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या निवडणुकीत उपद्रवी असलेल्यांवर विशेष लक्ष
गेल्या काही निवडणुकांमध्ये उपद्रवी असलेल्या समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या सूचना अपर पोलीस महासंचालकांनी दिल्या असून त्यानुसार हिस्ट्रीशिटरांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यातील उपद्रवींवर कारवाई करण्यात येणार आहे. नोटीसची तात्काळ बजावणी प्रतिबंधात्मक कारवाई करताना रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर कलम 107 नुसार कारवाई करण्यात येत आहे. पूर्वी या कारवाईसाठी तहसिलदारांकडे प्रस्ताव पाठविण्यात येत होते. परंतु यावर्षी तहसिलदारांकडे प्रस्ताव दिल्यानंतर तात्काळ नोटीस काढून संबंधिताला त्याची बजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे कारवाया होण्याचे प्रमाण देखील वाढले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सांगितले.