वडिलानंतर महिन्याभरात मुलाचाही मृत्यू

0

दादावाडीतील श्रीरामनगरातील घटना; पाण्याची टाकी साफ करताना गच्चीवरुन पडले रस्त्याव

जळगाव :शहरातील दादावाडी परिसरातील श्रीरामनगर येथील भास्कर मोतीराम पाटील (79) यांचे गेल्या महिन्यात 8 जानेवारी रोजी निधन झाले होते. त्यानंतर घराच्या गच्चीवर पाण्याची टाकी साफ करत असताना मुलगा देवेंद्र भास्कर पाटील (51) यांचा तोल जाऊन खाली पडून 23 जानेवारी रोजी जखमी झाले होते. खासगी हॉस्पिटलमध्ये ते मृत्यूशी झूंज देत असताना त्यांचाही मृत्यू झाल्याची घटना 8 फेब्रुवारी (शनिवारी) रोजी घडली.

भास्कर मोतीराम पाटील हे मूळ न्हावी येथील असून ते दादावाडी परिसरातील श्रीरामनगर येथे वास्तव्यास होते. ते भुसावळ रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा 8 जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्यांचा मुलगा देवेंद्र पाटील हे ह.मु. ठाणे कोमटी याठिकाणी वास्तव्यास आहेत. ते तंत्रशिक्षण विभागात राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत होते. वडिलांचे निधन झाल्याने ते जळगावला थांबले होते. 23 रोजी सायंकाळी ठाणे येथे जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट त्यांनी बुक केली होते. त्यादिवशी दुपारी ते घराच्या गच्चीवरील पाण्याची टाकी मुलासोबत साफ करत होते. त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडून त्यांच्या डोक्याला तसेच चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृतीत सुधारणा होईल, असा आशावाद कुटुंबियांना असताना शनिवारी दुपारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास त्यांची मृत्यूशी झूंज संपून त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

देवेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी प्राची, मुलगा सोजत, आई मंदा असा परिवार आहे. येथील डॉ. आर.एम.पाटील यांचे ते पुतणे होत. देवेंद्र पाटील यांच्या मृत्यूची वार्ता कळाल्यानंतर कुटुंबीयांसह नातेवाईकांना जबर मानसिक धक्का बसला. शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात नेरी येथील वैकुंठधामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महामार्गावर अज्ञान वाहनाने महिलेला चिरडले

जळगाव: पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सिनीअर के.जी.ला असलेल्या मुलीची गॅदरिंग पाहून घराकडे येत असताना मागून भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीवरून खाली पडल्यानंतर अंगावरून चाक गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू तर पतीसह मुलगी व भाचा जखमी झाल्याची घटना वाटीका आश्रमसमोरील हॉटेल एकविराजवळ शनिवारी, 8 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. गायत्री समाधान पाटील (27, रा. वाणीगल्ली, पिंप्राळा) असे मृृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर अज्ञात वाहन घेऊन चालक पसार झाला आहे.

सविस्तर असे, पिंप्राळा येथे समाधान पाटील हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी परी ही पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सिनीअर के.जी.ला शिक्षण घेते. तिची गॅदरिंग असल्याने समाधान तसेच त्यांच्या पत्नी गायत्री, भाचा रिदम असे स्कूलमध्ये दुचाकीने गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर मुलगी परी हिला सोबत घेऊन चौघे जण दुचाकीने घराकडे निघाले होते. दरम्यान मागवून भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला कट मारला. त्यामुळे तोल जाऊन महिलेसह अन्य तीन जण बाजूला फेकले गेले. महिलेच्या अंगावरून मागच्या वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याचे दिसल्यानंतर प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेस तात्काळ जिल्हा रूग्णालयात हलविल्यावर तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषीत केले. जखमी पती समाधान, मुलगी परी तसेच भाचा रिदम या तिघांना उपचारार्थ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.