वडील अभ्यास करू देत नाही म्हणून मुलाची पोलिसांकडे धाव

0

जळगाव – अभ्यास म्हटला की, मुलांना कंटाळा येतो. विविध बहाणे करून अभ्यास टाळण्याचा प्रयत्न मुले करीत असतात. जामनेरमध्ये मात्र, अभ्यासासाठी 12 वर्षीय मुलाने आज चक्क पोलीस ठाणेच गाठले आणि सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. वडील अभ्यास करू देत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची त्याने मागणी केल्याने सर्वच जण अवाक् झाले.
जामनेर शहरातील अजय लक्ष्मण कुमावत (वय 12) हा शेंगोळा येथील आश्रमशाळेत शिकतो. त्याची आई शेतात मजुरी करते तर वडील मिस्त्री काम करतात. कुमावत दाम्पत्याला दोन मुले व एक मुलगी आहे. दोन्ही मुले शेंगोळे आश्रमशाळेत शिकतात.
बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बाहेर पाऊस सुरू असताना अजय हा हाफचड्डी व बनियानवर, चिंब ओल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात आला आणि वडिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागला. त्याच्या या मागणीने सारेच जण अवाक् झाले. वडील रात्रभर टीव्ही पाहतात, अभ्यास करू देत नाही, मारहाण करतात अशी तक्रार त्याने केली.

खाकीतील माणुसकीने विद्यार्थ्याला केली मदत
अजयची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस कर्मचारी नीलेश घुगे यांनी त्याला दुकानात नेले. तेथून कपडे घेऊन दिले, तो म्हणाला, सँडलसुद्धा पाहिजे. मग काय साहेबांनी सॅण्डलही घेऊन दिले. अभ्यास करण्याची इच्छा असूनही वडील अभ्यास करू देत नसल्याची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक इंगळे यांनी त्याच्या आई, वडिलांना बोलावून घेतले आणि त्यांची समजूत घातली. या घटनेने अजयची शिक्षणाबद्दलची तळमळ तर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या खाकी वर्दीतील माणुसकीचेही दर्शनही घडले.