वरणगाव सेंट्रल बॅकेच्या मॅनेजरशी वाद घालत पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा

0

संशयीत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात ; वादामुळे पोलिस ठाण्यात तणाव

भुसावळ- एटीएम कार्ड व चेकबुक घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने सेंट्रल बँकेचे मॅनेजर मंगेश गोंडाणे यांच्याशी हुज्जत घालून वाद केल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर संशयीताला वरणगाव पोलिस ठाण्यात आणल्यानंतर दोघा भावांनी पोलिसांशी हुज्जत घालून गोंधळ केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ चालल्यानंतर दोघा भावांना अटक केल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी नेल्यानंतर प्रकृती अस्वास्थामुळे दोघांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
वरणगावच्या सेंट्रल बँकेत युवराज संजय देशमुख हे एटीएम कार्ड व चेकबुक घेण्यासाठी आल्यानंतर एटीएम दिल्यानंतर चेकबुक घेण्यासाठी देशमुख यांना बसण्यास सांगण्यात आले. यावरुन बँक मॅनेजर मंगेश गोंडाणे यांच्याशी देशमुख यांची शाब्दिक चकमक उडाली. या वेळी बँकेने पोलिस ठाण्यात फोन करून याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिस कर्मचारी नागेंद्र तायडे व रामचंद्र तायडे हे बँकेत पोहचले. यावेळी पोलिसांनी युवराजला पोलिस ठाण्यात आणले व यावेळी मॅनेजरही तेथे आल्यानंतर युवराज यांनी बँक मॅनेजरच्या दिशेने मोबाइल भिरकावला तर पोलिसांनी आवरण्याचा प्रयत्न केला असता देशमुख यांचा भाऊ मानसिंग संजय देशमुख याने पोलिसाची काठी पकडून ‘माझ्या भावाला का मारतोस’ असे म्हटल्याने वाद उफाळल्याने काही वेळ पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस कर्मचारी रामचंद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून दोघा भावांविरूद्ध तर बँक मॅनेजर मंगेश गोंडाणे यांच्या फिर्यादीवरुन युवराजविरुद्ध भादंवि 186 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अपर अधीक्षकांची धाव
पोलिस ठाण्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, मुक्ताईनगरचे पोलिस उपअधीक्षक सुभाष नेवे यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. याप्रसंगी राज्य राखीव दलासह पोलिसांनी अप्रिय घटना टळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त राखला.