वळसे पाटील असो की विलास लांडे खासदार मीच: शिवाजीराव आढळराव पाटील

0 1

भोसरीकरांच्या नात्या-गोत्याचा प्रश्‍नच नाही; महेश लांडगे माझाच प्रचार करणार

पिंपरी चिंचवड : शिवसेना, भाजपाची युती झालेली आहे. उद्या राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील किंवा विलास लांडे शिरूरच्या रिंगणात उतरले तरी पुढील खासदार मीच होणार असा ठाम विश्‍वास खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप जाहीर न झाल्याने शिरूरमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरूध्द राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील किंवा विलास लांडे अशी लढत होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर, पिंपरी चिंचवड महापालिकेत खासदार आढळराव पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधत, समोर दिलीप वळसे पाटील असोत की विलास लांडे खासदार तर मीच होणार असे विधान केले आहे. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महिला संघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.

महेश लांडगेंशी चर्चा करणार 
भोसरीचे आमदार महेश लांडगे युतीच्या विचाराचे आहेत. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची एकत्रपणे काम करण्याची मानसिकता झाली आहे. यात भोसरीकरांच्या ‘नात्या-गोत्या’चा प्रश्‍नच नाही. महेश लांडगे माझाच प्रचार करतील. लवकरच त्यांना भेटून प्रचाराबद्दल चर्चा करणार असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार विलास लांडे आणि भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्यातील ‘नात्या-गोत्या’मुळे दोघांत दिलजमाई झाल्याची चर्चा रंगली होती. या शक्यतेमुळे सलग तीन वेळा खासदार झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग आता खडतर झाल्याचे बोलले जात आहे.

मने नक्कीच जुळून येतील 
लांडे-लांडगेंच्या या नात्या-गोत्याबाबत बोलताना खासदार आढळराव पाटील म्हणाले की, शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षाची युती झाली आहे. महेश लांडगे अपक्ष आमदार असले तरी भाजपाच्या अर्थात युतीच्या विचाराचे आहेत. लोकसभा मतदारसंघातील युतीच्या प्रत्येक आमदाराला सोबत घेऊन प्रचार करणार आहे. महेश लांडगे यांच्यावर मी कधीच वैयक्तीक टिका केली नव्हती. युती झाली आहे, मने नक्कीच जुळून येतील. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची एकत्र काम करण्याची मानसिक तयारी झाली आहे. देशावर लष्करी संकट आहे. आता नरेंद्र मोदींच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे.

लांडगे युतीचा प्रचार करतील 
युतीसाठी मी आग्रही होतो, स्वत:साठी नव्हतो. काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेत येण्याची संधी न देण्यासाठीच एकत्र लढणे फायद्याचे ठरणार आहे. हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती झालीय. भोसरी मतदार संघाचा विकास झालायं. महेश लांडगे यांच्यावर मी कधी वैयक्तीक आरोप केले नाहीत. कामातील काही गोष्टी आवडल्या नाही त्या समोरासमोर मांडल्या असं सांगत महेश लांडगे माझाच प्रचार करतील असं खासदार आढळराव पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.