वाटेतच बिघाड झालेल्या 108 रुग्णवाहिकेत प्रसूती, बाळाचा मृत्यू

0

अनेकदा फोन करुनही दुसरी रुग्णवाहिका पोहचलीच नाही ; उपलब्ध असून नसल्याचे फोनवर उत्तर ; भोंगळ कारभारामुळे कुटुंबियांचा संताप

जळगाव – तालुक्यातील धामणगाव येथील खटाबाई चंद्रभान सपकाळे वय 24 या महिलेला प्रसूतीसाठी 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवित असतांना वाटेतच ममुराबाद कृषी फार्मजवळ रुग्णवाहिकेत बिघाड झाला. यानंतर तब्बल दोन तास कुटुंबिय तसेच रुग्णवाहिकेतील पारिचारिकेने अनेकदा संपर्क साधूनही दुसरी 108 रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर वाहनातच तिची प्रसूती होवून बाळाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. अखेर खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात महिलेला हलविण्यात आले. याठिकाणी पाच रुग्णवाहिका उभ्या असतांनाही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने मयत बाळाच्या वडीलांसह नातेवाईकांनी एकच संताप व्यक्त करत गोंधळ घातला व कारवाईची मागणी केली होती. दरम्यान या घटनेने पुन्हा जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

रुग्णवाहिका पोहचलीच नाही, बाळाचा मृत्यू
धामणगाव येथील चंद्रभान देविदास सपकाळे हे शेती करतात. पत्नी खटाबाई व 3 वर्षाचा रुद्र नावाचा मुलगा असा त्यांचा परिवार आहे. खटाबाई ह्या काही दिवसांपासून गरोदर होत्या. शुक्रवारी मध्यरात्री 2.30 वाजता अचानक खटाबाई यांना प्रसूती कळा सुरु झाल्या. पती चंद्रभान यांनी तत्काळ 108 रुग्णवाहिकेला फोन केला. अर्धातासातच रुग्णवाहिका घरी पोहचली. रुग्णवाहिकेतून खटाबाई यांना जिल्हा रुग्णालयात हलवित असतांना, ममुराबाद येथे खाजगी रुग्णालयात तपासणी केली, याठिकाणाहून एक पारिचारिकाही रुग्णवाहिकेतून सोबत आली. वाटेतच ममुराबाद कृषिफार्मजवळ रुग्णवाहिकेत बिघाड झाला. रुग्णवाहिका पुन्हा सुरु झाली नाही. तेथील चालकासह खटाबाई यांचे पती व पारिचारिका यांनी अनेकदा 108 वर संपर्क साधला मात्र त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अखेर बिघाड झालेल्या रुग्णवाहिकेत प्रसूती झाली. यात बाळाचा मृत्यू झाला. गोंडस बाळाला खटाबाई यांनी जन्म दिला मात्र अत्यावश्यक सुविधा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

5 रुग्णवाहिका अन् उपलब्ध नसल्याचे उत्तर
4.30 वाजेपर्यंतही रुग्णवाहिका न पोहचल्याने पती चंद्रभान सपकाळे यांनी खाजगी वाहनातून पत्नी खटाबाई हिस जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. चंद्रभान सपकाळे यांना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रत्यक्षात पाच 108 रुग्णवाहिका उभ्या असल्याचे दिसले. रुग्णवाहिकाच्या शेजारी उभे राहूनच चंद्रभान सपकाळे यांनी 108 वर संपर्क साधला. त्यांना पुन्हा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळाले. यावेळी त्यांनी फोनवर बोलणार्‍याला पाच रुग्णवाहिकाउभ्या असतांनाही उपलब्ध नसल्याचे कसे सांगतात, असे म्हटल्यावर समोरील बोलणार्‍या व्यक्तीने फोन कट केला, अशी माहिती चंद्रभान सपकाळे यांनी बोलतांना दिली.

बाळाच्या मृत्यूस जबाबदार कोण?
वेळेत रुग्णवाहिका पोहचली असती तर त्याच्यावर वेळेत उपचार होवून बाळाचा मृत्यू झाला नसता तसेच रुग्णवाहिका असतानाही रुग्णवाहिका नसल्याचे उत्तर देण्यात आल्याने चंद्रभान सपकाळे यांच्यासह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला व कारवाईची मागणी केली. जबाबदार अधिकारी न मिळाल्याने रुग्णवाहिका विभागातील डॉक्टरांकडे सपकाळे यांनी तोंडी तक्रार करुन संबंधितांवर कारवाई मागणी केली. दरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही सपकाळे यांना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने का सांगण्यात आल? याप्रकरणातील दोषींवर कारवाई होणार का? हा प्रश्‍न कायम आहे. 108 रुग्णवाहिका सुविधा नावालाच असल्याचा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.

जिल्हा रुग्णालयता एकच रुग्णवाहिका उपलब्ध होती, बाळाच्या मृत्यूबद्दल खेद आहे, पालकांच्या सांगण्यानुसार जर जिल्हा रुग्णालयात घटना घडली त्यावेळी पाच रुग्णवाहिका असतील तर, या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येईल- डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय