वारिस पठाणांविरुध्द संताप

0

भाजपातर्फे गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवसेनेतर्फेही निषेधात्मक आंदोलन

जळगाव: एमआयएमचे माजी आमदार तथा प्रवक्ते वारीस पठाण यांनी वादग्रस्त विधान करून देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी त्यांच्यावर कलम 153 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपातर्फे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भाजपातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील जनतेला उद्देशुन एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी मंगलोर येथे चिथावणीखोर भाषण केले आहे. देशातील सव्वाशे कोटी जनतेबद्दल केलेले विधान हे देशात अराजकता माजविण्याच्या उद्देशाने केले आहे. अशा विधानामुळे देशातील शांतता भंग पावण्याची शक्यता आहे. अशा विधानामुळे देशातील जनतेमध्ये भितीचे वातावरण आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करणारे वक्तव्य दखलपात्र गुन्हा असुन माजी आमदार वारीस पठाण यांच्यावर कलम 153 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.

यांची होती उपस्थिती

पोलीस निरीक्षक यांना निवेदन देतांना भाजपाचे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, सुशील हासवाणी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे वारीस पठाणच्या पुतळ्यावर शाई फेकली

शिवसेनेच्या महानगर शाखेतर्फेही माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला. आज शहरातील टॉवर चौकात शिवसेना महानगरतर्फे वारीस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर शाई फेकुन निषेध करण्यात आला. यावेळी महानगरप्रमुख शरद तायडे, मानसिंग सोनवणे, पप्पु भावे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. पोलीसांनी लागलीच हा पुतळा ताब्यात घेतला.