वाल्मिक नगरात पैसे वाटपाच्या संशयावरून हाणामारी

0

दोन उमेदवारांसह कार्याकर्त्यांमध्ये जोरदार हाणमारी; रात्री 12.30 वाजेची घटना

जळगाव । महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून वाल्मिकनगरातील घरकुल चौकात पैसे वाटपाच्या संशयावरून दोन उमेदवारांसह कार्याकर्त्यांमध्ये जोरदार हाणमारी झाल्याची घटना रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. यात उमेदवाराच्या मुलाचे डोके फुटले असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात परस्परांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर वाल्मिक नगरातील घरकुल चौकात पैसे वाटपाच्या संशयावरून प्रभाग क्रमांक-3 चे भाजपचे उमेदवार दत्तात्रय देवराम कोळी व शिवसेनेचे उमेदवार राहुल मोहन ठाकरे उर्फ मोगली यांच्यासह उमेदवारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी भाजपाचे उमेदवार दत्तात्रय कोळी यांच्यासह त्याचा मुलगा जय याला शैलेंद्र रामदास ठाकरे यांने विट मारुन जखमी केले. तर शांताराम ठाकरे यांने लाकडी काठयांनी मारहाण केली. दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण होवून गोंधळ झाला होता. घटनेची माहिती कळताच डीवायएसपी साचिन सांगळे शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रविण वाडीले यांनी धाव घेतली, त्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर हाणामारी करणार्‍या दोन्ही गटाला डीवायएसपी सांगळे यांनी चांगलाच दणका दिला.

शनिपेठ पोलिसात परस्परांविरुध्द तक्रार
शनिपेठ पोलिसात याप्रकरणी परस्परविरूध्द तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दत्तात्रय देवराम कोेळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शैलेश रामदास ठाकरे, शांताराम ठाकरे, यशवंत उर्फ रवी ठाकरे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शैलेश रामदास ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल पुंडलिक सपकाळे, सुभाष देवराम कोळी, जय दत्तु कोळी यांच्याविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी शैलेश रामदास ठाकरे, शांताराम ठाकरे, यशवंत उर्फ रवी ठाकरे या तिघांना अटक केली आहे.

गेंदालाल मिल झाली हाणामारी
पेैसे वाटपावरून गेंदालाल मिल परिसरात देखील रात्री दोन गटात हाणामारी झाली होती. शहर पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत वाद मिटला होता. दरम्यान याबाबत पोलिसांत कुठलीही नोंद नव्हती.