वाल्हेकरवाडी स्मशानभूमीचा संघर्ष पेटला; भाजपचे माजी उपमहापौर सचिन चिंचवडे करणार उपोषण

0

स्मशानभूमीबाबत आयुक्तांसोबत बैठक, स्मशानभूमी काम सुरु करण्याची मागणी

पिंपरी ः स्मशानभूमीवरुन रावेत विरुध्द वाल्हेकरवाडी नागरिकांतून संघर्ष विकोपाला गेला आहे. तेथील स्मशानभूमीचे काम जवळपास 60 टक्के पुर्ण झाले आहे. परंतू, रावेत परिसरातील सोसायट्यांनी स्मशानभूमीला विरोध दर्शविल्याने काम बंद करुन ते उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतला असून आम्हाला उद्यान नको, स्मशानभूमीच हवी, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, वाल्हेकरवाडी स्मशानभूमीचे काम तत्काळ न सुरु केल्यास सोमवार (दि.17) भाजपचे माजी उपमहापौर सचिन चिंचवडे बेमुदत उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे आयुक्तासोबत (शनिवार दि.15) होणार्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोसायटीधारकांचा विरोध…
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील पेठ क्रमांक 32 अ मधील जाधव घाटाजवळच्या आरक्षित जागेवर अत्याधुनिक गॅसवरील शवदाहिनीसह स्मशानभूमी विकसित होणार आहे. मात्र, या जागेजवळील सोसायट्यांमधील नागरिकांनी या स्मशानभूमीला विरोध दर्शविला आहे. रावेत, प्राधिकरण, शिंदे वस्ती, वाल्हेकरवाडी आदी भागांतील नागरिकांना रावेत येथील पंपिंग स्टेशन, निगडी किंवा चिंचवड येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जावे लागते. पण तेथे अपुर्‍या सोयीसुविधांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या नव्या स्मशानभूमीमुळे येथील स्थानिकांना दिलासा मिळणार आहे. या स्मशानभूमीत वायुप्रदूषण नियंत्रण यंत्रणा असेल. या कामाची जबाबदारी महापालिकेकडे असेल. तर या कामाचा खर्च प्राधिकरण करणार असून, दीड वर्षात हे काम पूर्ण होईल. सीमाभिंत, रस्ते, इमारत, मुख्य प्रवेशद्वार, स्वच्छतागृह, सुरक्षारक्षक, अंतर्गत सजावट यांचा समावेश आहे.

उद्यान विकासित करण्याच्या नागरिकांच्या सूचना…
दरम्यान, स्मशानभूमीचे जवळपास 60 टक्के काम पुर्ण झाले आहे. नागरिकांच्या विरोधामुळे ते काम बंद केले आहे. स्मशानभूमी ही परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी असली, तरी तिला शेजारील कासीटा, पवनी प्राइड, हार्मोनी, ध्रुव सिद्धी, रॉयल व्हिजन, ब्लूमिंग डिल, रिद्धी सिद्धी या सोसायट्यांचा विरोध आहे. या सोसायट्यांमध्ये सुमारे दोन हजार नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. त्या ठिकाणी उद्यान विकसित करावे, असे नागरिकांनी सुचविले आहे. परंतू, वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांनी आम्हाला उद्यान नको, स्मशानभूमी हवीय, अशी मागणी केली आहे. याबाबत (शनिवार दि.15) आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासमवेत रावेत, वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधीची बैठक होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतू, आयुक्तांनी स्मशानभूमीचे काम सुरु न केल्यास भाजपचे माजी उपमहापौर सचिन चिंचवडे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी आयुक्तांना दिला आहे.