विद्यापीठाकडून भेदभाव, कर्मचार्‍यांचेे वेतन थांबले

0

जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून प्रभारी प्राचार्यांना मान्यता देण्यात भेदभाव केला जात असल्याने मराठा विद्याप्रसारक मंडळ संचालित वरणगाव महाविद्यालयातील कर्मचार्‍यांचे पगार दोन महिन्यांपासून रखडले आहेत. विद्यापीठाच्या कारभारामुळे या सर्वांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे, असा आरोप एन-मुक्ता संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. नितीन बारी यांनी केला आहे.

प्रा. नितीन बारी यांनी विद्यापीठाच्या कारभारावर बोट ठेवत दोन महाविद्यालयांचा विचार करताना त्यात राजकारण करू नये, असा टोलाही लगावला आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, मराठा विद्याप्रसारक मंडळ संचालित वरणगाव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यांचे तात्पुरते मान्यतापत्र विद्यापीठात प्रलंबित आहे. त्यामुळे तेथील सर्व कर्मचार्‍यांचे दोन महिन्यांपासून वेतन थांबले आहे. त्यावर विद्यापीठात विचारणा केली असता, त्यावर ठेवणीतील उत्तरे मिळतात. मात्र, याच संस्थेच्या यावल येथील महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्यांना तत्काळ मान्यता देण्यात आली आहे. एकाच संस्थेतील दोन महाविद्यालयांबाबत विद्यापीठाची परस्पर विरोधी भूमिका का? हे उलगडणारे कोडेच आहे. याबाबत विचारणा केल्यावर हा विषय कायदे विभागाकडे गेला आहे, असे उत्तर मिळत असल्याचे प्रा. नितीन बारी यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी राज्यपालांकडे तक्रार केली असल्याची माहिती त्यांनी दिली.