विद्यापीठाचा विद्यार्थ्यांकरीता स्तुत्य उपक्रम

0

जळगाव – राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठ व सर्व महाविद्यालयांना दि. १४ एप्रिल पर्यंत सुट्या जाहीर केल्या आहेत, तर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना घरी राहुन करण्याची सूचना केलेली आहे. या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अत्याधुनिक संगणक प्रणाली द्वारे तयार केलेल्या विविध ऑनलाईन प्रणाली आधारे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मोबाइल, संगणक चा वापर करीत घरुन कामकाज करण्याची व्यवस्था केली आहे.

या उपक्रमात दि. १८ मार्च पासूनच अभ्यासक्रमाचे व्हिडियो, व्याखाने व प्रश्नसंच उपलब्ध करुन दिलेली आहेत. सदर अभ्यासक्रमाच्या साहित्यामध्ये प्राध्यापक घरी बसुन उपलब्ध संसाधनाद्वारे जसे की मोबाइल, वेब कॅमेरा, संगणक, लॅपटॉप आदीचा वापर करीत व्हिडियो, व्याखाने व प्रश्नसंच आजही ऑनलाइन उपलब्ध करुन देत आहेत. एकुण १३००० प्रश्नासह साधारण १०० पेक्षा जास्त विषयांचे प्रश्नसंच, ३० व्हिडिओज य़ाव्यतिरीक्त ऑनलाइन शिक्षण व्यवस्थापन प्रणालीमध्ये विद्यापीठाने मानव संसाधन विकास विभाग, नवी दिल्ली, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली च्या विविध उपक्रमांतर्गत इनफ्लीबनेट, शोधगंगा, शोधगंगोत्री, शोधसिंधू ई., अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली चे उपक्रम एन.एम.इ.आय़.सी.टी., एन.पी.टी.इ.एल. द्वारे उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा वापर करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन दिलेली आहे. तसेच SWAYAM, MOOC या शैक्षणिक सुविधा देखिल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्या आहेत.

या सर्व ऑनलाइन सुविधांचा वापर करण्यासंदर्भात विद्यापीठ परिसरातील १६०० विद्यार्थ्यांना दि. १७ मार्च रोजी त्यांच्या व्यक्तीगत ईमेल वर तसे कळविण्यात आले होते तसेच वरील सुविधा या विद्यापीठाच्या संकेत स्थळावरील Quick Links-Knowledge Resource Centre व Student Corner-E-Resources अंतर्गत उपलब्ध आहेत.