कोरोना नियंत्रणासाठी शहरातील दुकाने, आस्थापनांवर असणार नजर

0

मनपाचे पथक नियुक्त ; गर्दी टाळण्याचे आवाहन

जळगाव: कोरोनामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यासह शहरात जीवनावश्यक सेवा वगळता सर्व बंदचे आदेश देण्यात आले आहे. यापार्श्‍वभूमीवर मनपातर्फे देखील उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील दुकाने,हॉटेल, बाजार बंद आहे की,नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी मनपाचे पथक नियुक्त केले आहे. त्यानुसार अधिकार्‍यांना अधिकार प्राधिकृत करण्यात आले आहे.

कोरोनामुळे रविवारी जनता कर्फ्यू लावण्यात आले होते. तसेच 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले असून जमावबंदी लागू करण्यात आले आहे. तरीही देखील शहरात काही ठिकाणी सर्रासपणे दुकाने सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शहराच्या नियंत्रणासाठी पथक नियुक्त केले आहे. दुकाने किंवा आस्थापना खुले ठेवल्यास कारवाई केली जाणार आहे. जळगाव मनपा कार्याक्षेत्रामध्ये आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची असून त्यासाठी मनपा अधिकारी व कर्मचारी यांची प्रभाग समिती व वॉर्डनिहाय नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांवर नियंत्रक अधिकारी म्हणून मनपा उपायुक्त मिनीनाथ दंडवते,उपायुक्त अजित मुठे, मुख्य लेखा परिक्षक संतोष वाहुळे, मुख्यलेखाधिकारी कपील पवार,व्ही.ओ.सोनवणी,सुभाष मराठे,एस.एस.पाटील,उदय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभागातील सर्व वार्डामध्ये गर्दी होणार नाही, यांची दक्षता घेण्याचे निर्देश मनपा आयुक्त सतिश कुळकर्णी यांनी दिले आहेत. तसेच नियुक्त अधिकारी व कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घेवून वार्डस्तरावर आरोग्य निरीक्षकांनी त्यांचे अधिनस्त मोकादम यांची याकामी नेमणूक करुन आदेशाची अंमलबजावणी करावी व त्यासंदर्भातील अहवाल आयुक्तांना सादर करावे, असे सुचित करण्यात आले.

मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा

थकीत मालमत्ताकर मार्चअखेर भरणे गरजेचे आहे. तसेच आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर भरणा करण्यासाठी बिलेदेखील बजाविण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याने त्यावर नियंत्रणासाठी उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी महापालिकेत किंवा प्रभाग समिती कार्यालयामध्ये नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना मालमत्ता व पाणीपट्टी कर भरावयाचे असतील त्यांनी कार्यालयात न येता ऑनलाईन मालमत्ता कराचा भरणा करावा, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. करदात्यांनी हीींिीं://ुुु.क्षरश्रसरेपाल.ेीस या संकेत स्थळावर मालमत्ता कराचा भरणा करावा.