विद्यार्थ्यांना देखील ‘स्टडी फ्रॉम होम’

0

शहादा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी देऊन शिक्षकांना वर्क फ्राँम होमचे आदेश आहेत. आता विद्यार्थ्यांना देखील ‘स्टडी फ्रॉम होम’ देण्यात आला आहे. वसंतराव नाईक विद्यालयाने हा उपक्रम राबविला आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रथम संपुर्ण राज्यात ३१ मार्च पर्यत लाँकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे शाळा- महाविद्यालयांना १६ मार्च पासुन सुट्या देऊन शिक्षकांना वर्क फ्राँम होमचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी संपूर्ण देशातच २१ दिवसाचा लाँकडाऊन घोषित केल्याने विद्यार्थ्यांच्या सुट्यांमध्ये १४ एप्रिलपर्यत वाढ झाली. या सुटीत विद्यार्थ्यानी अभ्यास करावा म्हणुन शिक्षकांप्रमाणेच आता विद्यार्थ्यांना देखील ‘स्टडी फ्रॉम होम’ देण्यात आला आहे. सातपुडा शिक्षण संस्थेचे विभागीय सचिव प्रा संजय जाधव यांच्या सूचनेवरून वसंतराव नाईक विद्यालयाने हा उपक्रम राबविला आहे. यासंदर्भात विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील सोमवंशी यांनी इयत्ता ५ वी ते ९ वीच्या सर्व वर्गशिक्षकांना आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना ‘स्टडी फ्रॉम होम’ देण्यास सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी सुटी कालावधीत पाढे पाठ करणे, गणित- भूमितीची सूत्रे पाठ करणे, रोज २०/२५ ओळी शुध्दलेखन लिहिणे, म्हणी, वाकप्रचार पाठ करणे, कविता पाठ करणे असा अभ्यास देण्यात आला आहे. शाळा सुरु झाल्यानंतर हा अभ्यास तपासला देखील जाणार आहे.

शिक्षणाधिकारींचा विद्यार्थींना संदेश – जिल्हा शिक्षणाधिकारी एम व्ही कदम यांनी देखील सोशल मिडियावरुन विद्यार्थ्यांना सुटीचे कसे नियोजन करावे याचा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी सुटीत खेळायला बाहेर न पडता टी. व्ही. वरील बातम्या ऎका, चांगली पुस्तके वाचा, शब्दकोडे सोडवा, आवडीची गाणी ऎका, प्राणायाम करा व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.