विनापरवानगी टॉवर उभारणार्‍यांवर गुन्हे दाखलचे आदेश

0

निमखेडी शिवारातील नागरिकांची तक्रार ; मनपाने बजावली नोटीस

जळगाव: शहरातील निमखेडी शिवारात एका खासगी कंंपनीच्या मोबाईल टॉवरसाठी विनापरवानगी चक्क चारशे मीटरच्या रस्त्याचे खोदकाम केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. विशेष म्हणजे ज्या टॉवरसाठी हे काम केले तो टॉवरच अनधिकृत असल्याची बाबही उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबधित घरमालक व कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपायुक्त अजित मुठे यांनी दिले आहेत.

टॉवरच्या नावाखाली रस्त्यांचे खोदकाम सुरु केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बुधवारी निमखेडी भागातील नागरिकांनी याबाबत उपायुक्त अजित मुठे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. दरम्यान, याआधीही निमखेडी गट क्रमांक 107 वर मोबाईल टॉवर अनधिकृतपणे उभारल्याने संबधित जागा मालकाला मनपाने नोटीस बजावली होती. मात्र, त्या नोटीसीला जागा मालकाने कुठलेही उत्तर दिले नाही. त्यानंतर 22 जानेवारी रोजी अंतीम नोटीस बजावून उभारण्यात आलेले टॉवर निष्कासीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. संबधिताने आठ दिवसांपुर्वी टॉवरच्या केबलसाठी 400 मीटर रस्त्याचे खोदकाम केले. नागरिकांकडून याबाबत मनपाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जागा मालक व मोबाईल कंपनीने मनपाकडे रस्त्याच्या खोदकामासाठी परवानगीचा प्रस्ताव पाठविला. मनपाने याप्रकरण कलम 53,54 नुसार अंतीम नोटीस बजावली असून, या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. निमखेडीतील प्रकार उघडकीस आल्याने मनपाने याठिकाणी कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, शहरभरात 103 टॉवर अनधिकृत असून, यावर आतापर्यंत मनपाप्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.