विरोधकांच्या तोंडी पाकिस्तानी भाषा – गिरीश महाजन

0

पहूर ता जामनेर (वार्ताहर) – पंतप्रधान मोंदीसारखे वादळ देशाला लाभल्याने देशाला दिशा मिळाली आहे. देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असून पुन्हा भाजपचेच सरकार बहुमताने येणार आहे. मोदिंनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. विरोधक पुरावे मागून राजकारण करीत आहेत. विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचे सांगून ना. गिरीश महाजन यांनी गांधी घराण्यावर घणाघाती टिका केली.
जामनेर रोडवरील जिनिंग मध्ये आयोजित भाजपच्या वतीने मोटारसायकल विजयी संकल्प रॅलीच्या समारोप प्रसंगी ना.गिरीश महाजन बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल, तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जे.के.चव्हाण, उपसभापती सुरेश बोरसे, कृउबास सभापती संजय देशमुख, सरंपच पती रामेश्वर पाटील, शेतकि संघाचे संचालक साहेबराव देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष दौलत घोलप, माजी सभापती बाबुराव घोंगडे, सलीम शेख गणी, ललीत लोढा, अमर पाटील, अतिष झाल्टे, कमलाकर पाटील, अरंविद देशमुख, शरद पांढरे, रवींद्र मोरे, वासुदेव घोंगडे, डॉ. प्रशांत भोंडे, यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरंपच, उपसरपंच, व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
आचारसंहितेपुर्वी भागपूरच्या कामास सुरवात
पुढे बोलतांना ना.महाजन म्हणाले मोदी सरकारने शेतकरी हिताच्या योजना राबविल्या असून शेती मालाला दीड पट हमीभाव दिला आहे. हे काँग्रेस सरकारला करता आले नाही.अनेक नवीन योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला आहे. पाचोरा व जामनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी दिले जाईल. जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी देण्याचा दिलेला शब्द असून आचारसंहिता लागण्यापूर्वीच भागपूर योजनेचे भुमीपुजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. देशात भाजपा शिवाय सक्षम पर्याय उरला नाही. सरकार आल्यानंतर पुढील पाच वर्षात देशाचा चेहरा मोहरा बदलून जाईल. जगाच्या पाठीवर भारत देश नंबर एकचे राष्ट्र म्हणून उदयास येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक चंद्रकांत बाविस्कर यांनी तर सुत्रसंचालन नवलसिंग पाटील यांनी केले. विधानसभा क्षेत्रातून विजय संकल्प रॅली काढून त्याचा समारोप पहूर येथे करण्यात आला आहे.