Saturday , March 17 2018

विरोधी पक्षनेता बदलणार!

15 वर्षे सत्ता भोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सभागृहात बोटचेपी भूमिका
योगेश बहल 20 मार्चला देणार राजीनामा; मंगला कदम, दत्ता साने, अजित गव्हाणे, नाना काटे यांच्या नावाची चर्चा

पिंपरी-चिंचवड : महापालिकेत तब्बल 15 वर्षांनी विरोधात बसवावे लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक वर्ष होऊनही विरोधी पक्षाची भूमिका आक्रमकपणे बजाविता आली नाही. अभ्यासू विरोधी पक्षनेता असून देखील सत्ताधार्‍यांच्या चुकीच्या कारभाराला सक्षमपणे विरोध होताना दिसून आला नाही. त्यामुळेच विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान योगेश बहल 20 मार्चच्या महासभेत पदाचा राजीनामा देतील. दरम्यान, विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर मंगला कदम, ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने, नाना काटे आणि अजित गव्हाणे यांच्या नावांची चर्चा आहे.

बहलांची सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी
महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे केवळ 36 नगरसेवक निवडून आले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली. परंतु, बहल यांनी सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी केल्याचा सूर पक्षातून आवळला जाऊ लागला. त्यामुळे विरोधी नेता बदलाच्या हालचाली पक्षात सुरु झाल्या होत्या. आपल्या विरोधात पक्षातील नगरसेवक तक्रारी करत असल्याने बहल यांनी देखील राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी पवार यांच्याकडे पदाचा राजीनामा देखील सोपविला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बहल देखील या पदावर राहण्यास इच्छूक नसल्याचे दिसून येते. 20 मार्च रोजीच्या महासभेत बहल महापौरांकडे राजीनामा देणार आहेत.

प्रखर विरोध करू शकणार्‍याची निवड
या पदासाठी माजी महापौर मंगला कदम, दत्ता साने, नाना काटे आणि अजित गव्हाणे यांच्या नावांची चर्चा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याची गणिते समोर ठेवूनच अजित पवार निवड करतील. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणारा, चुकीच्या कामाला प्रखर विरोध करणार्‍या अभ्यासू नगरसेवकाकडे धुरा सोपविली, जाण्याची शक्यता आहे.

पालिकेतील विरोधी पक्षनेता वर्षाला बदलण्याचा निर्णय झाला आहे. पाच वर्षात पाच विरोधी पक्षनेते करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. बहल यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. 20 मार्चच्या महासभेत ते राजीनामा देणार आहेत. त्यानंतर नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे.
-संजोग वाघेरे, शहराध्यक्ष

हे देखील वाचा

उद्यानाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यास मंजुरी

ठराव एकमताने मंजूर झाला सांगवी : पिंपळे सौदागर येथे विकसित होत असणार्‍या उद्यानाला राजमाता जिजाऊ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *