विवाहितेचे दागिने लांबवणार्‍या उत्तरप्रदेशातील चोरट्यांना पोलिस कोठडी

0

यावल : युपीतील चोरट्यांच्या यावल पोलिसांनी बसमध्ये दागिने चोरताना मुसक्या आवळल्या आहेत. दौजी बाहुरी सिंग (वय 45), रिजवान मुनाफ झोजे (वय 36), कदीम मुस्ताक झोजे (वय 26) व खुर्शीद महंमद ईर्शाद (वय 26, सर्व रा. उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींना यावल न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.नितीन खरे यांनी बाजू मांडली.

बॅग कापून लांबवले होते दागिने
यावलहून रविवारी सकाळी भुसावळला जाण्यासाठी एसटी बस (क्रमांक एम. एच. 40 एन. 9036) निघाली असताना प्रवासी मनाली नितीन मराठे (वय 32) या महिलेची यावल ते अंजाळे प्रवासादरम्यान बॅग कापून चोरट्यांनी त्यातील 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने शिताफीने काढले होते तर अंजाळे गावाजवळ प्रवाशांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर प्रवाशांनी वाहक एस.पी.महाजन यांना घटनेची माहिती दिली. वाहकांनी बस चालक एस. एस. पाटील यांना घटनेची माहिती देत यावल पोलिसांनाही चोरीची माहिती दिली. पोलिस निरिक्षक अरूण धनवडे पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. एसटी बस यावल पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मनाली मराठे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.