विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न : विटव्यासह खिर्डीतील चौघा आरोपींना शिक्षा

0

भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल : सासुला पाच वर्ष तर पतीसह नणंदांना तीन वर्ष शिक्षा व प्रत्येकी पाच हजारांची दंड

भुसावळ : रावेर तालुक्यातील विटवा येथील सासर व मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरच्या रहिवासी असलेल्या विवाहितेने प्लॉट घेण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याने तिचा पतीसह सासु व नणंदांकडून छळ सुरू होता शिवाय पतीकडून विवाहितेला शॉक देवून मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आरोपी सासुने विवाहिता चुलीवर स्वयंपाक करीत असताना तिला रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता तर या घटनेत विवाहिता 34 टक्के भाजली होती. 2016 मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात चालले. या खटल्यात आरोप सिद्ध झाल्याने सासुला पाच वर्ष तर पतीसह दोघा नणंदांना तीन वर्ष शिक्षा तसेच प्रत्येकी पाच हजारांचा दंड भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.आर.आर.भागवत यांनी सुनावला.

पैसे न आणल्याने विवाहितेला ठार मारण्याचा प्रयत्न
मध्यप्रदेशातील शहापूरस्थित विवाहिता पूजा कोळी हिचा 2013 मध्ये विटव्यातील रहिवासी तथा आरोपी भिका भास्कर कोळी याच्याशी विवाह झाल्यानंतर आरोपी पतीसह सासु गीताबाई भास्कर कोळी तसेच खिर्डीतील नणंदा शोभा कोळी तसेच संगीता कोळी यांच्याकडून प्लॉट घेण्यासाठी पैसे आणावेत म्हणून छळ सुरू होता. पतीने या दरम्यान पत्नीस शॉक देवून ठार मारण्याचाही प्रयत्न केला होता तर सासु गीताबाई कोळी यांनी विवाहिता चुलीवर स्वयंपाक करीत असताना तिला रॉकेल टाकून पेटवून दिले होते तर पतीने यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या घटनेत विवाहिता 34 टक्के भाजली होती. या घटनेप्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. आठ साक्षीदार तपासण्यात आले. विवाहिता, तिचे वडील तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. आरोपीला सासुला पाच वर्ष तर पतीसह दोघा नणंदांना प्रत्येकी तीन वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.प्रवीण पी. भोंबे तर आरोपीतर्फे अ‍ॅड.पी.आर.मोझे यांनी काम पाहिले.