विवाह सोहळ्यातून दिला पाणी बचतीचा संदेश

0

हिंगोणेतील बोरसे कुटूंबीयांतर्फे पाणी बचतीबाबत प्रबोधन

चाळीसगाव – हिंगोणे येथील विवाह सोहळ्यात येणार्‍या वर्‍हाडींमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने नवदाम्पत्यांनी पाणी बचतीचा संदेश दिला. पाणी फाउंडेशनच्या सौजन्याने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्ताने वधु- वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या वर्‍हाडींना पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे येथील काशिनाथ बोरसे यांचे सुपुत्र तथा पारोळा येथील वसंतराव मोरे पॉलिटेक्निकचे प्रा. एकनाथ यांचा विवाह गोराडखेडा (ता. पाचोरा) येथील दीपाली यांच्याशी आज पार पडला. विवाहाला येणार्‍या नातेवाइकांसह आप्तेष्टांमध्ये पाण्याविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने विवाहाच्या मंडपात पाणी फाउंडेशनच्या सौजन्याने पाणी टंचाईचे दुष्परिणाम, दुष्काळाची दाहकता, जलसंवर्धनाचे फायदे, श्रमदानातून ग्रामविकास आदी विषयांवरील माहिती असलेले बॅनर्स व पोस्टर लावण्यात आले होते. विवाह सोहळ्यात वधु- वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्यांना आहेर ऐवजी पाण्याची बाटली भेट देण्यात आली. वर एकनाथ व वधू दीपाली यांच्या हस्ते या बाटल्यांची भेट दिल्यामुळे या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश दिला गेला. या अभिनव उपक्रमासाठी पाणी फाउंडेशनचे समन्वयक विजय कोळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पाणी फाउंडेशनचे सहकारी महादेव मोरे, सोमाजी भसारकर, नीलेश पगारे, नंदकिशोर पाटील, बबलू पाटील, हिंगोणे सोसायटीचे चेअरमन सयाजी पाटील यांच्यासह माजी आमदार दिलीप वाघ उपसभापती पोपट भोळे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चव्हाण बेलगंगा संचालक बाळासाहेब पाटील, रावी संचालक विश्वास चव्हाण सदानंद चौधरी बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील संचालक सरदार राजपूत ,नगरसेवक नाना कुमावत योगेश चौधरी यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.