विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची हत्या !

0

लखनऊ : विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची लखनऊचा हजरतगंज या श्रीमंत भागामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आज रविवारी सकाळी फिरण्यासाठी निघालेल्या विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. रणजित बच्चन हे गोरखपूरचे रहिवासी आहेत. सकाळी जेव्हा ते मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते तेव्हा दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिस हल्लेखोरांचा तपास करत आहे.

रणजीत बच्चन हे हजरतगंजच्या ओसीआर इमारतीमध्ये राहत होते. यापूर्वी ते समाजवादी पक्षामध्ये होते. ते त्यांचा भाऊ आशिष श्रीवास्तव सोबत फिरण्यासाठी निघाले होते. परिवर्तन चौकामध्ये ग्लोब पार्कमधून बाहेर पडताच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एक गोळी डोक्याला लागल्याने रणजीत यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही अंनिसचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांची अशीच काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये हत्या करण्यात आली होती. तर कोल्हापुरात विचारवंत गोविंद पानसरे यांनाही असेच लक्ष्य करण्यात आले होते.