विश्‍वामित्र आयटी मिलन पारिवारिक स्नेहमिलन उत्साहात

0

पिंपरी :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देहू गटातील चिखली येथे एकमेव चालत असलेल्या विश्‍वामित्र आयटी मिलन, शिवतेजनगरचा संक्रांती निमित्त स्वयंसेवकांच्या कुटुंबासाठी स्वामी विवेकानंद सांस्कृतिक हॉल, फुलेनगरमध्ये आयोजित केलेला स्नेहमिलनाचा कार्यक्रम नुकताच अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यात एकूण 19 कुटुंब आपल्या मुलांसोबत या कार्यक्रमास सहभागी झाले होते. यावेळी कुटुंबाचे महत्व अधोरेखित आणि भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाचे असलेले महत्व समजून सांगण्यासाठी जिल्ह्याचे प्रचार प्रमुख उमेशजी कुठे उपस्थित होते.

एकत्र कुटुंबाचे फायदे आणि भारतीय संस्कृतीला त्याचे वरदान याविषयी उमेशजी कुठे यांनी नेमक्या शब्दात उपस्थित एकूण 19 कुटुंबाचे प्रबोधन केले. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील सख्खी आणि चुलत भावंडे एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने राहतात असे ते म्हणाले. यापुढे त्यांनी एकत्र कुटुंबाचे महत्व सांगत असताना सांगितले कि, मुलांची वाढत्या वयातील जडणघडण व त्यांच्यावर होणारे सकारात्मक संस्कार हे एकत्र कुटुंबाच्या घरात होताना दिसतात. लहानग्या सदस्यांच्या शंकांचे निराकारण एकत्र कुटुंबातील जेष्ठ सदस्याकडून होते, जे आजच्या पिढीकडून होताना दिसत नाही, त्याचे मुख्य कारण म्हणजे विभक्त कुटुंब पध्दती होय.

उमेश कुठे यांच्या मार्गदर्शनानंतर उपस्थित कुटुंबाची एकमेकांना ओळख व्हावी म्हणून खेळातून परिचय या धर्तीवर खेळ श्रीकृष्ण काशीद यांनी घेतले. आणि त्यांना मंगेश पाटील यांची मोलाची साथ लाभली. तत्पूर्वी , प्रास्ताविक देहू गटाचे वस्ती रचना प्रमुख श्रीकृष्ण काशीद यांनी केले. तर निवेदन लाहिरी बेल्लारीकर यांनी आपल्या मंजुळ आवाजात केले. वैभव आहेर यांनी विश्‍वामित्र आयटी मिलनामार्फत घेतल्या गेलेल्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमाची उपस्थितांना माहिती दिली. देहू गटाचे सहकार्यवाह ओंकार खोल्लम सपत्नीक या कार्यक्रमास उपस्थित होते. अभिजीत कुलकर्णी यांनी उपस्थित कुटुंबाचे आभार मानले. शेवटी रात्रीचे भोजन करत मोकळ्या गप्पा मारत, असा कार्यक्रम पुढील काळात पण आयोजित करू याची ग्वाही आयोजकडून करून घेत हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.