व्हेंटिलेटर खरेदीसाठी 10 लाख रुपये

0

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची घोषणा : नागरिकांनी घाबरू नये

जळगाव :कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. तथापि, तातडीची परिस्थिती उद्भवल्यास अडचण येवू नये, जिल्ह्यातील नागरीकांना तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयास व्हेंटीलेटर खरेदीसाठी आमदार निधीतून 10 लाख रुपये देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून भारतात आतापर्यंत 117 रुग्णांची नोंद झाली आहेत. तर राज्यात एकूण 37 रुग्ण आढळून आले आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या 10 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 8 रुग्णांचे नमुने तपासणीत निगेटिव्ह आलेले आहेत. एका व्यक्तीचा रिपोर्ट येणे बाकी असून आज एका व्यक्तीचा नमुना पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तथापि, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील नागरीकांनी दक्षता घ्यावी. तसेच सर्व धर्मियांनी गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

अपंगत्व तपासणी 31 मार्चपर्यत स्थगित

कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी अपंगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता ही तपासणी 31 मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरीकांच्या अडचणींना त्यांच्या मेलवरच उत्तर देण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले.

जिल्हा रूग्णालयात 10 खाटा राखीव

कोरोना व्हायरसाचा धोका लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा रुग्णांसाठी 10 बेड राखून ठेवण्यात आले आहे. तर 5 बेडचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती डॉ. खैरे यांनी दिली. याठिकाणी तातडीच्या उपाय योजना म्हणून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना दिल्यात.

अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई

समाज माध्यमांतून कोरोना संदर्भात अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या जावून समाजात भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे. अशा अफवा पसरविणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी सर्व संबंधितांना दिलेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान, दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून) 31 मार्चपर्यंत साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिले आहे. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच चित्रपटगृह, जलतरण तलाव, नाट्यगृहे देखिल बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

आठवडे बाजारही बंद

जिल्ह्यात अमळनेर, कुर्‍हे पानाचे, कोल्हाडी, अंधारी, दहिवद, अडावद, वड्री, साळवा, रिंगणगाव, फत्तेपुर, कर्की, नायगाव, हरताळा, नगरदेवळा, सामनेर, सातगाव (डो), खानापुर, लोहारा, विवरे बु., न्हावी प्रचा, सावखेडासिम, सांगवी बु. वाडे, गुढे, शिंदी, हरणखेड, बहाळ, वाघळी, गणेशपुर, लोंढे, धानोरा, म्हसावद, नांद्रा, वढोदा, वरखेडी, निंभोरा बु., मोरगाव, तांदळवाडी, दसनुर, हिंगोणा, भालोद येथील आठवडे बाजारही दि. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.