व्हॉटस्अ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून होतेय परीक्षा

1

नूतन मराठा महाविद्यालयातील कारभार चव्हाट्यावरः विद्यापीठाच्या नियमांची पायमल्ली

जळगाव: परीक्षा सुरु असतांना कौल पडल्याने पाच विद्यार्थीनी जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेत गंभीर जखमी विद्यार्थीनीच्या तिच्या मोबाईलवर कौल पडल्याने नुकसान झाले आहे. एम कॉमच्या प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्यांनी इंटर्नल ही परिक्षा होते. त्यात मोबाईल विद्यार्थीनीकडे आला कसा? याबाबत माहिती घेतली, विषयाची प्रश्नपत्रिकेची प्रत न देता ती व्हॉटस्अ‍ॅप पाठवून त्यानुसार परीक्षा घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुतन मराठा महाविद्यालयात समोर आला आहे.

प्रकाराची खुद्द अशा प्रकारच्या परीक्षेला सामोरे जात असलेल्या विद्यार्थ्याने नापास होण्याच्या भितीने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. व्हॉटस्अ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून एकाच बेंचवर एकाच वर्गाचे दोन विद्यार्थी बसवून पेपर घेतले जात असल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे शिक्षणाचा आयचा घो असा याप्रमाणे अशा प्रकाराच्या परिक्षेला सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित होत असून कारवाईची मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांसोबत परीक्षेला मोबाईल कसा?

विद्यापीठ असो महाविद्यालयाच्या परीक्षा असो परिक्षेदरम्यान मोबाईल नेण्यास विद्यार्थ्यांना बंदी असते. मात्र विद्यार्थी परिक्षेला मोबाईलला परवानगी कशी दिली. याबाबत विद्यार्थ्याला विचारले असता, त्याने दिलेली माहिती अशी, विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून वर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचा व्हॉटस्अ‍ॅप गृप तयार करण्यात आला आहे. यावर परीक्षेबाबत तसेच इतरही माहिती दिली जाते. दुसरे सेमिस्टर आहे मात्र आतापर्यत एकही लेक्चर झालेले नाही. इंटर्नल परीक्षेसाठी शनिवारी महाविद्यालयात आल्यावर तयार केलेल्या व्हॉटस्अ‍ॅपवर गृपवर संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. मोबाईलमध्ये प्रश्न बघून देण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेवर प्रश्नाचे उत्तर लिहण्याच्या सुचना देण्यात आल्या. असा पेपर सोडविला. यापूर्वीही एका बेंचवर एकाच वर्गाचे दोन विद्यार्थी बसवून त्यांना एकच प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. अशी परीक्षा दिली होती. आता थेट व्हॉटस्अ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याने आश्चर्य असल्याचेही विद्यार्थ्याने सांगितले.

मोबाईलमधून प्रश्नपत्रिका सोडवितांना घटना

कौल पडल्याच्या घटनेत ज्या विद्यार्थीनीला चार टाके पडले, तिचा मोबाईलचेही नुकसान झाले आहे. मोबाईलमध्ये व्हॉटस्अ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी तिने मोबाईल बेंचवर ठेवला होता. मोबाईलमधून प्रश्न पाहून ती सोबतच्या विद्यार्थीनीसह पेपर लिहीत असतांनाच कौल पडल्याची घटना घडली. यात मोबाईलवर कौल पडल्याने त्याचेही नुकसान झाले. या घटनेमुळे नुतन मराठा महाविद्यालयात परीक्षेला विद्यार्थ्यांसोबत मोबाईल व त्यातच व्हॉटस्अ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पाठवुन परीक्षा या दोन्ही गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत.

आम्ही प्रश्नपत्रिका छापून विद्यार्थ्यांना देत असतो. व्हॉटस्अ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून परिक्षा घेतल्याचा प्रकार महाविद्यालयातील कुणीही प्राध्यापक करणार नाही. तसेच एका बेंचवर दोन वेगवेगळ्या वर्गाचे विद्यार्थी बसवून परीक्षा घेतली जाते. त्यामुळे दोन्ही गोष्टी बिलकुलच शक्य नाही, असे कधीच होणा नाही. परंतु असा प्रकार महाविद्यालयात घडला असेल तर त्याची शहानिशा करतो. डॉ. एल.पी.देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय

या प्रकाराची कुणाचीही तक्रार आलेली नाही, किंवा प्रकार माहिती पडलेला नाही. एकाच बेंचवर एकाच वर्गाचे दोन विद्यार्थी व व्हॉटस्अ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून परिक्षा घेणे गंभीर बाब आहे. प्रकार नेमका काय आहे, त्याबाबत माहिती घेतो. त्याची चौकशी करुन जे दोषी असतील, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रा. डॉ. पी.पी.पाटील, कुलगुरु, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

आज घडलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. यामागे मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्यास शिवाय हे होऊ शकत नाही. यामुळे विद्यापीठाच्या कायद्याला अक्षरशः धाब्यावर बसवले गेले आहे. कायद्याशी खिलवाड आहे हे दुर्दैवी आहे. आता प्राचार्य देशमुख हे कोणालाच मान्य नाही असे वाटते. याप्रकरणी देखील आपण लवकरच क ब च उ म वि चे मा. कुलगुरू यांची भेट घेणार आहोत. पियुष नरेंद्रअण्णा पाटील