शहरातील आठवडे बाजार बंद; मनपात नागरिकांना प्रवेशबंदी

0

जनता कर्फ्यूत सहभागी होण्याचे महापौर भारती सोनवणे यांचे आवाहन

जळगाव: कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यापार्श्‍वभूमीवर दि. 31 मार्च पर्यंत जळगाव शहरातील मंगळवारचा हरिविठ्ठल नगर , बुधवारचा पिंप्राळा बाजार आणि शनिवारचा कारमवाजीचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश मनपा उपायुक्तांनी दिले आहे. बाजारात जीवनावश्यक वस्तू विक्री करणारे हॉकर्स, भाजीपाला, फळ विक्रेते यांचा नागरिकांशी मोठ्याप्रमाणात संपर्क येतो. त्यामुळे त्यांनी विशेष करून तोंडाला रुमाल किंवा मास्क लावावा तसेच शक्य असल्यास सॅनिटायझरचा उपयोग करावा. तसेच रविवारी ठेवण्यात येणार्‍या जनता कर्फ्यूत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.

मनपात बारनिशी विभाग सुरु

मनपातील अधिकारी,कर्मचार्‍यांना कोरेना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दी कमी करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या तक्रारी किंवा अर्ज स्वीकारण्यासाठी पहिल्या मजल्यावर बारनिशी विभाग सुरु करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत नागरिकांना मनपात प्रवेश बंदी करण्यात येत असल्याचे आदेश उपायुक्त अजित मुठे यांनी दिले आहे.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा

शहरात अद्यापपर्यंत कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळून आला नसला तरी शहरात बाहेरून येणार्‍यांची आणि विशेषतः रोजच्या कामासाठी उपडाऊन करणार्‍यांची संख्या मोठी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारात भाजीपाला, फळे विक्री करणारे तसेच शहरात फिरणारे हॉकर्स यांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावावा. शक्य असल्यास सॅनिटायझरचा देखील उपयोग करावा. नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनापासून लढा देण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जळगावकर नागरिकांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनता कर्फ्यूचे पालन करावे. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये, कोणत्याही ठिकाणी गर्दी करून उभे राहू नये असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.

स्थायी समिती सभापतींच्या दालनाचे निर्जंतूकीकरण

कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणाच प्रादुर्भाव होत आहे. मनपात काही कामानिमित्त नागरिक येत असतात. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी आपले दालन तसेच आयुक्तांचे दालन निर्जंतूक केले आहे. भेटीसाठी येणार्‍या नागरिकांना सॅनिटायझरद्वारे हात स्वच्छ केल्यानंतर प्रवेश देण्यात येत आहे.
मनपा इमारतीतील सर्व विभाग आणि प्रभाग समिती कार्यालय,सर्व युनिट कार्यालयाचे निर्जंतूकीकरण करावे अशी विनंती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना केली आहे.