शहरातील प्रदूषण वाढले

0

पुणे : शहरातील हवेचे प्रदूषण वाढतच चालले असल्याचे विविध अहवालांतून स्पष्ट झाले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जात
आहेत. मात्र प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही तातडीची उपाययोजना राबविली जात नसल्याचे सांगत महापालिकेच्या पर्यावरण विभागाने तुर्तास हात झटकले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण
मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, सफर अशा विविध संस्थाच्या पाहणीत पुणे शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. पीएम 102 आणि पीएम 2.52 हे शहराच्या हवेतील सर्वाधिक प्रदूषणकारी घटक असून त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पीएम 102 अथवा 2.5च्या नियमानुसार प्रमाण 100/ पर क्युबिक मीटर असणे आवश्यक आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनुसार फेब्रुवारीत हे प्रमाण 126.92 इतके होते. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालातदेखील देशातील सर्वाधिक हवा प्रदूषित शहराच्या यादीत पुण्याचा पहिल्या 10 क्रमांकमध्ये समावेश आहे. एकूणच शहराच्या हवेचे प्रदूषण वाढत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दीघे म्हणाले, हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल, वृक्षारोपण यांसारख्या दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मात्र अजून तातडीच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यासंदर्भात एअर प्युरिफायर बसविण्याचा उपाय विचाराधीन होता. त्यासाठी काही संस्थांनी मदत करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र हे पंप कितपत उपयुक्त आहेत, याबाबत कोणत्याही संस्थेने प्रमाणित केले नव्हते. तसेच या यंत्रणांसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होणार होता. या सर्व गोष्टींचा विचार केला असता एअर प्युरिफायर हा सक्षम पर्याय न वाटल्याने महापालिकेने तो रद्द केला. यासंदर्भात सोलर पंप बसविण्यासाठी शोध सुरू आहे. तसेच सीएसआरच्या माध्यमातूनदेखील उपाय योजना राबविण्याचे आवाहन केले जात आहे.