शहरात कचरा संकलन तसेच वाहतुकीवर प्रचंड खर्च होऊनही अनियमितता

0 1

घरात कचरा जिरविणार्‍या नागरिकांची विशिष्ठ स्पर्धा न घेता मालमत्ता करात सवलत दिली जावी

इसिएतर्फे महाालिका आयुक्तांना दिले निवेदन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दिवसेंदिवस नागरिकीकरण वाढतच आहे. उद्योगाबरोबरच आता शहरात शिक्षणासाठीही विद्यार्थी येत आहेत. पुढे इथेच स्थायिक होतात. ठिकठिकाणी शहरातील इमारती वाढत आहेत. त्यामुळे नागरिकीकरण वाढल्याचा ताण पाणी पुरवठा अशा मुलभूत सुविधांवर ताण येत आहे. शहरामध्ये कचराही मोठ्या प्रमाणात होत असतो. आपल्या शहरात कचरा संकलन व वाहतुकीवर होणारा प्रचंड खर्च आणि त्यातील अनियमितता अभ्यासता इसिएच्या शहर सुधारणा समितीने पुढील पर्याय सुचविले आहेत, त्याबाबत गंभीरतेने विचार व्हावा आणि त्या प्रमाणे महापालिकेने धोरण स्वीकारावे. महापालिकेने घरात कचरा जिरविणार्‍या नागरिकांची विशिष्ठ स्पर्धा न घेता मालमत्ता करात सवलत दिली जावी, त्याचा फायदा महापालिकेस होणार आहे.

अशा योजना राबवाव्यात
ज्या घरातील ओला कचरा घराच्या आत/आवारातच विघटन होत असेल त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची नोंद महापालिका आरोग्य विभागाकडे करण्याची यंत्रणा महापालिका आरोग्य निरीक्षक कार्यालयात होणे गरजेचे आहे. नागरिकांनी महापालिका आरोग्य निरीक्षक कार्यालयावर जावून मालमत्ता कर पावतीच्या आधारे स्वत:च्या कार्याबाबत नोंद करावी. त्यानुसार त्या विभागातील आरोग्य कर्मचार्‍यांनी त्याची सत्यता पुढील 3 महिने सातत्याने पडताळणे आवश्यक आहे. गरज भासल्यास त्याबाबत शहानिशा त्रयस्त सामाजिक संस्थेकडून करून घ्यावी. जे नागरिक या परीक्षणात उत्तीर्ण होतील त्यांचाच विचार कर सवलतीसाठी केला जावा. जे नागरिक गृह प्रकल्पात राहतात आणि त्यांचा ओला कचरा ते सोसायटीच्या आत जिरवतात त्यांनासुद्धा वरील निकषाप्रमाणे उत्तीर्ण होणे गरजेचे असेल. सुक्या कचर्‍याचे जे नागरिक स्वतः व्यवस्थापन करतात अथवा महापालिकेच्या आरोग्य विभागास सुपूर्द करीत नाहीत त्यांना वाढीव 5 गुण जास्त दिले जावेत. ज्या नागरिकांनी सोलर उर्जाचे प्रकल्प इमारतीवर उभारले आहेत त्यांची नोंदसुद्धा वेगळ्या पद्धतीने करून घेवून त्यासाठी काही वाढीव 5 गुण जास्त दिले जावेत. रेन वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प उभारलेल्या इमारतीमधील सर्व रहिवाशांना वाढीव 5 गुण जास्त दिले जावेत.

कचरा डेपो वरील ताण कमी
या सर्व सुचना महापालिकेने या पूर्वीच विचारात घेतल्या असल्या तरी त्याबाबत असलेली धोरणे नागरिकापर्यंत पोहचविण्यात महापालिका आरोग्यसेवा विभागास यश मिळाले नाही. कारण सवलती प्राप्त करण्यासाठी स्पर्धा सत्र महापालिकेने जाहीर केले आहे. त्यामुळे कित्येक नागरिक या स्पर्धेत पात्र होत नाहीत आणि मुळ हेतू पासून दूर जातात. ही स्पर्धा बाजूला हटवून/ बंद करून त्याठिकाणी सरसकट केलेल्या सुजाणतेच्या कार्याचा गौरव व पाठींबा दाखविण्यासाठी सरसकट मालमत्ता करात त्यांच्या सहभागा प्रमाणे सवलत दिली जावी. त्याच्यावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. महापालिकेने जर ही सुचना स्वीकारली आणि नागरिकांपर्यंत आशयाची सुविधा व्यवस्थितपणे पोहचली तर आपल्या शहरातील 35 % कचर्‍याचा भार महापालिकेचा त्वरित कमी होईल. एकूण कचर्‍या पैकी 350 टन कचरा नागरिक स्वतः आपल्या घरीच जिरवतील आणि त्यामुळे महापालिका कचरा डेपो वरील ताण कमी होईल.