शहिद जवान संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणार

0

सांत्वन भेटीप्रसंगी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची ग्वाही

मुक्ताईनगर- जम्मू काश्मीरातील पुलवामा येथे भारतीय सैन्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मलकापूर येथील वीर जवान संजयसिंह भिकमसिंह राजपूत शहीद झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांनी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुःखद समयी संपुर्ण देश तुमच्या पाठीशी असल्याचे खडसे म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी अंतिमसंस्कार स्थळी जावुन संजयसिंह राजपुत यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. याप्रसंगी खडसे म्हणाले की, मलकापूर येथे स्व.संजयसिंह राजपुत यांचे स्मारक व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे जेणेकरून भावी पिढीला प्रेरणा मिळेल या स्मारकासाठी आपण शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करू, केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीतला हा विषय असून आपण त्यासाठी पाठपुरावा करू तसेच खासदार रक्षा खडसे यांच्या खासदार निधीतून विशेष बाब म्हणून स्मारकासाठी निधी उपलब्ध करून बलिदान व्यर्थ जाणार नाही , असे भावनिक प्रतिपादन खडसे यांनी केले. याप्रसंगी नगराध्यक्ष हरीष रावळ, अनिल झोपे, रामभाऊ पाटील, दिलीप नाफडे, मोहन पाचपांडे, हरीभाऊ गोसावी, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.