शिरसाड दंगल : 11 आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा

0

एकास तीन अन्य 10 जणांना दोन वर्ष सक्तमजुरी : एक लाख 21 हजारांचा दंडही सुनावला

भुसावळ : यावल तालुक्यातील शिरसाड येथील आंबेडकर नगरात 11 सप्टेंबर 2017 रोजी मुलगी पळवून नेल्याच्या कारणावरून दंगल उसळली होती. आरोपींनी फिर्यादी यास लोखंडी सळईने व लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी यावल न्यायालयात खटल्याचे कामकाज चालल्यानंतर मंगळवारी यावल न्यायालयाचे न्या.डी.जी.जगताप यांनी 11 आरोपींना दोषी ठरवत एकास तीन वर्ष तर अन्य 10 आरोपींना दोन वर्ष सक्त मजुरीसह एक लाख 21 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.

मुलगी पळवल्यावरून उसळली होती दंगल
11 सप्टेंबर 2017 रोजी शिरसाड गावातील डॉ.आंबेडकर नगरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपी छायाबाई अनिल सोनवणे व अनिल धोंडु सोनवणे यांच्या मुलीला तक्रारदार वसंत मंगा इंगळे यांच्या मुलाने पळवून नेल्याच्या संशयावरून आरोपी छायाबाई सोनवणे, अनिल धोंडु सोनवणे, जितु उर्फ जितेंद्र धोंडु सोनवणे, धर्मा उर्फ धर्मेंद्र धोंदु सोनवणे, किरण धोंडु सोनवणे, प्रभाकर पुना जाधव, रमेश यशवंत भालेराव, किशोर रमेश भालेराव, आशा प्रभाकर जाधव, संगीता रतीलाल भालेराव, राजु रतीलाल भालेरव, विनोद रतीलाल भालेराव (सर्व रा.शिरसाड, ता. यावल) यांनी संगनमत करीत तक्रारदाराच्या घरात शिरून त्यास लोखंडी सळईने व लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले तसेच इंगळे यांच्या घरातील सामानाची तोडफोड केली होती. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर यावल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यानंत एक आरोपी रमेश भालेराव याचे निधन झाल्याने 11 आरोपींविरुद्ध कामकाज चालले.

दहा साक्षीदारांची नोंदवल्या साक्ष
सरकारी वकील अ‍ॅड. नितीन खरे यांनी या खटल्यात एकूण दहा साक्षीदार तपासले. त्यात तक्रारदार वसंत इंगळे, शासकीय पंच आनंद बनकर, रंभाबाई इंगळे, नबाबाई इंगळे, समाधान इंगळे, प्रमोद इंगळे, सागर इंगळे, भावलाल भालेराव, डॉ.देवराज व तपासी अंमलदार पीएसआय अशोक अहिरे यांची साक्ष नोंदवण्यात आली तर सरकारी वकील अ‍ॅड. नितीन खरे यांचा युक्तीवाद प्रभावी ठरला. न्या.जगताप यांनी आरोपी अनिल सोनवणे यास तीन वर्षे सक्तमजुरीची व 10 हजार रुपये दंडाची तसेच अन्य सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमांखाली दोषी ठरवुन दा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच सर्व आरोपींना मिळून एकुण एकल लाख 21 हजार दंडाची शिक्षादेखील सुनावली. त्याच प्रमाणे या दंडाच्या रक्कमेतून रुपये 15 हजार फिर्यादी वसंत इंगळे यास नुकसानीपोटी देण्याचा आदेश देखील न्यायालयाने केला. दरम्यान, यावल न्यायालयात सरकारी वकील अ‍ॅड नितीन खरे यांनी चालविलेल्या खटल्यात एकाच आठवड्यात तीन फौजदारी खटल्यात एकुण 16 आरोपींना शिक्षा झाली आहे हे देखील विशेष !