शिवसेना आमदारांना दुसऱ्यास्थळी हलविण्याच्या हालचाली !

0

मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच अधिकच वाढत चालला आहे. आज सत्ता स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसल्याने महायुतीला बहुमत असताना देखील सरकार बनवता येत नाही. राजकीय वातावरण पाहता घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवले होते. दरम्यान आता रंगशारदामधून दुसऱ्यास्थळी आमदारांना हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हॉटेल रंगशारदा येथे दोन बसेस दाखल झाल्या असून यातून सर्व आमदारांना दुसऱ्यास्थळी हलविण्यात येत आहे.

आज शुक्रवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलविली होती. ही बैठक आता सुरु असून बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे आमदारांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री पदावरील दावा भाजप-शिवसेना सोडत नसल्याने निकाल लागून १५ दिवस झाल्यानंतर देखील नवीन सरकार अस्तित्वात येऊ शकलेले नाही. आज सरकार स्थापन झाले नाही तर घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो.